रस्ता चौपदरीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:49 PM2018-12-28T22:49:25+5:302018-12-28T22:49:47+5:30
स्थानिक लोहारा- पिंपळगाव बायपासचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा मार्ग शहरातून जात असून येथून जडवाहनांची प्रचंड वर्दळ आहे. धामणगाव व अमरावती मार्गाला जोडणारा हा बायपास तब्बल २४ मीटर रूंद करून चौपदरी केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक लोहारा- पिंपळगाव बायपासचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा मार्ग शहरातून जात असून येथून जडवाहनांची प्रचंड वर्दळ आहे. धामणगाव व अमरावती मार्गाला जोडणारा हा बायपास तब्बल २४ मीटर रूंद करून चौपदरी केला जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण जमीनदोस्त केले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता.
लोहारा-पिंपळगाव बायपासवर अनेक वर्षापासूनचे अतिक्रमण होते. अनेकांनी तर येथे पक्क्या घराचे बांधकाम केले होते. बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली. इतकेच नव्हेतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोजमाप करून लाल पट्ट्याचे मार्किंग केले. त्यानंतरही येथील अतिक्रमण स्वत:हून काढण्यात आले नाही. अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने संयुक्त मोहीम हाती घेतली. पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर येणाऱ्या घरांवर जेसीबी चढवण्यात आला. रस्त्यावर येणाºया झोपड्या - पक्की घरे, विविध नामफलक, चबुतरे काढण्यात आले. ही मोहीम सकाळी १० वाजता सुरू करण्यात आली. लोहारा चौकातून अतिक्रमण मोहीम येत असल्याचे कळताच अनेकांनी स्वत:हूनच अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. वाघापूर नाका परिसरात झोपड्या काढताना तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी स्थिती हाताळत अतिक्रमण मोहीम कायम ठेवली. ही मोहीम आणखी दोन दिवस चालणार असल्याचे बांधकाम अभियंत्यांनी सांगितले.
अनधिकृत तरीही अगतिक
लोहारा, वाघापूर आणि पिंपळगाव परिसरातून जाणाऱ्या या बायपास मार्गालगत मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली आहे. लोहारा आणि वाघापूर येथे शेकडो गोरगरिबांनी अतिक्रमण करून झोपडीवजा घरे बांधून निवारा शोधला होता. आता रस्ता चौपदरीकरणासाठी ही घरे पाडली गेली. तर काही घरे अंशत: तोडली गेली. घरासाठी अतिक्रमण करणारे हे नागरिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने अगतिकही आहेत. मात्र अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना हुज्जतबाजी न करता अनेकांनी स्वत:हून आपल्या घरातील साहित्य बाजूला केले. भरथंडीत निवाºयाचा प्रश्न मात्र कायम आहे.