उमरखेडमध्ये अतिक्रमण हटाओ मोहीम
By admin | Published: January 10, 2016 03:02 AM2016-01-10T03:02:56+5:302016-01-10T03:02:56+5:30
राष्ट्रीय मार्ग रुंदीकरण आणि राज्य मार्गावरील काही भागात वाढत चालेले अतिक्रमण लक्षात घेता १४ जानेवारी रोजी येथे अतिक्रमण हटाओ मोहीम व्यापक प्रमाणावर राबविली जाणार आहे.
उमरखेड : राष्ट्रीय मार्ग रुंदीकरण आणि राज्य मार्गावरील काही भागात वाढत चालेले अतिक्रमण लक्षात घेता १४ जानेवारी रोजी येथे अतिक्रमण हटाओ मोहीम व्यापक प्रमाणावर राबविली जाणार आहे. यानिमित्ताने अतिक्रमण धारकांवर संक्रांत ओढविणार आहे.
शहरात अतिक्रमण हटाओ मोहीम वर्षभरापूर्वीच राबविण्याचे ठरले होते. परंतु विधानसभा निवडणुका डोळ््यासमोर ठेऊन ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास सुरूवात होण्याची चिन्हे आहेत. यामुळे या मार्गावरील शहरी भागाजवळचे अतिक्रमण हटविणे गरजेचे झाले आहे. तसेच राज्य मार्गावर बेसुमार अतिक्रमण वाढल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. ही मोहीम त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जाते. उपविभागीयस्तरावर सात जानेवारी रोजी या संदर्भात बैठक घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला यांनी नगरपरिषद प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश दिले आहे. १४ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्या संयुक्त पुढाकारात ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहीमेमध्ये मुख्य मार्गावरील, सार्वजनिक ठिकाणावरील तसेच अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)