शिंगाडा तलावावर अतिक्रमण

By admin | Published: June 3, 2016 02:25 AM2016-06-03T02:25:58+5:302016-06-03T02:25:58+5:30

वणी परिसरात पूर्वी तीन तलाव अस्तित्वात होते. मात्र त्यातील दोन तलाव अतिक्रमणाच्या घशात गेले.

Encroachment at Shingada lake | शिंगाडा तलावावर अतिक्रमण

शिंगाडा तलावावर अतिक्रमण

Next

सौदर्यीकरण सुरू : २४.७७ एकराचा तलाव परिसर, लोकसहभागाची गरज
वणी : वणी परिसरात पूर्वी तीन तलाव अस्तित्वात होते. मात्र त्यातील दोन तलाव अतिक्रमणाच्या घशात गेले. आता एकमेव उरलेल्या शिंगाडा तलावावरही जवळपास २० टक्के अतिक्रमण झाले आहे. याच तलावाचे लोकसहभागातून सौंदर्यीकरण सुरू करण्यात आले आहे.
तीन तलावांमुळे शहरातील विहिरींचे जलस्त्रोत जिवंत राहात होते. भूगर्भातील पाणी पातळी कायम राखण्यास हे तलाव मदत करीत होते. मात्र दोन तलाव आता नामशेष झाले. शिंगाडा तलावातही मोठ्या प्रमाणात सांडपाणी जात असल्याने कुत्रिम झरे आटले. उन्हाळ्याच्या शेवटी आता लोकसहभागातून या तलावाचे सौंदर्यीकरण सुरू करण्यात आले आहे.
शहराच्या मध्यभागी हा तलाव आहे. त्याचे क्षेत्रफळ १३३७७.८ चौरस मीटर (१३.३७७७७ हेक्टर) अर्थात जवळपास २४ एकर एवढे विस्तीर्ण आहे. हा तलाव सीपी अ‍ॅन्ड बेरार म्युन्सिपल अ‍ॅक्ट १९९२ कलम ३८ (१) बी.नुसार तत्कालीन शासनाने सेटलमेंट करून १४ जून १९९३ रोजी येथील नगरपरिषदेला हस्तांतरीत केला होता. या तलावाचा वापर नागरिकांना पाणी, शिंगाडा, मासे पकडण्यासाठी वापर करण्याचेही तेव्हा सुचविले होते.
या तलावात सांडपाणी जाऊ नये म्हणून एक पाच फूट खोल नाली तयार करण्यात आली होती. ती एका मीलमागून दर्ग्याजवळून निघून पूर्वीकडे रामाच्या देवस्थानाकडून सांडपाणी बाहेर नेत होती. सन १९९३ मध्ये नगरपरिषदेच्या तत्कालीन आरोग्य सभापतींनी नालीच्या ठिकाणी भूमिगत गटाराची योजना आणली. मात्र ती अपयशी ठरली होती. अखेर तलावाची भिंत फोडून सांडपाणी तलावात सोडून नियमाचा भंग करण्यात आला होता. तेव्हापासून या तलावात घाण व सांडपाणी साचण्यास सुरूवात झाली. तद्नंतर तलावावर अतिक्रमणही सुरू झाले. आता या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने शिंगाड्याचे उत्पन्न घेणे बंद आहे. तसेच मासेमारी बंदच आहे. तलावाचे कृत्रिम जलस्त्रोतसुद्धा नष्ट झाले आहे.
या तलावाची पाण्याची पातळी वाढावी म्हणून तत्कालीन नगराध्यक्ष आशा टोंगे यांनी २००१ च्या नगरपरिषद अर्थसंकल्पात २० लाख रूपये गाळ काढण्यासााठी व इतर कामासाठी तरतूद केली होती. त्याचबरोबर आयडीएसएमटी योजनेतून तलावाचे सौंदर्यीकरण, बगीचाची तरतूद करण्यात आली होती. त्यातून प्रथम तलावाला भिंत बांधण्यात आली. मात्र अतिक्रमण करणारे मुजोर झाल्याने त्यांनी ५० फूट भिंत पाडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. विशेष म्हणजे त्यावर नगरपरिषदेने कोणतीही कारवाई केली नाही. या तलावाच्या भरवशावर पूर्वी एका समाजाची पूर्ण उपजिवीका अवलंबून होती. त्यावेळी तलावाचा गाळ काढताना पाण्याचा उपसा करणे गरजेचे होते.
मात्र पाण्याचा उपसा सुरू असतानाच माजी नगराध्यक्षांचे पती पी.के.टोंगे यांना काही नागरिकांनी योजना समजून न घेताच मारहाण केली. ज्यांची उपजिवीका तलावावर अवलंबून होती, त्यांनीच तलाव शुद्धिकरणामध्ये व्यत्यय आणून काम बंद पाडले होते. आता या तलावाच्या पाण्यामध्ये संपूर्ण घाण निर्माण झाल्याने आॅक्सीजनचे प्रमाण कमी होऊन पाण्यात जीवाणू निर्माण झाले आहे. त्यामुळे शिंगाडा व मच्छिचे उत्पादन बंद पडले आहे. शासकीय निधीअभावी तलावाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता मिशन निर्मल निर्गुडा अभियान लोकसहभागातून पूर्णत्वास जात असताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक इंगोले यांना तलावाची व्यथा कळली. त्यांनी सदस्य, कर्मचारी व नागरिकांच्या सहभागातून तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाला सुरूवात केली आहे. (प्रतिनिधी)

नागरिकांच्या भरघोस मदतीची गरज

शिंगाडा तलावाचा गाळ काढणे व शहरातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने मुख्याधिकाऱ्यांच्या उपक्रमास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक दानशूरांनी या सहभागात भरीव आर्थिक मदत केली. सध्या तलावात एका जेसीबी मशिनच्या सहाय्याने गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी भरघोस मदत केली, तर हा तलाव पूर्वीचे गतवैभव प्राप्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात एक प्रेक्षणीय स्थळही निर्माण होणार आहे. लहान-मोठ्यांना विरंगुळ्याचे ठिकाणही उपलब्ध होणार आहे.

Web Title: Encroachment at Shingada lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.