दिवाळीच्या बाजाराला अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:20 PM2017-10-14T23:20:30+5:302017-10-14T23:20:43+5:30

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु आधीच अतिक्रमणाने त्रस्त असलेल्या बाजारपेठेला आता हॉकर्स-फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणात विळखा पडला आहे.

Encryption breaks in Diwali market | दिवाळीच्या बाजाराला अतिक्रमणाचा विळखा

दिवाळीच्या बाजाराला अतिक्रमणाचा विळखा

googlenewsNext
ठळक मुद्देहॉकर्स-फेरीवाल्यांचा त्रास : दुकानदारांचेही साहित्य बाहेर, वाहने पार्किंगला जागाच नाही, भांडणाची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु आधीच अतिक्रमणाने त्रस्त असलेल्या बाजारपेठेला आता हॉकर्स-फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणात विळखा पडला आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाºया ग्राहकांपुढे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.
यवतमाळच्या बाजारपेठेतील रस्ते ंआधीच अरुंद आहे. त्यात अनेक दुकानदारांनी आपला विक्रीसाठीचा माल दुकानाबाहेर आणून ठेवल्याने समोरील जागा व्यापली गेली आहे. त्यातच आता अनेक दुकानांसमोर हॉकर्स, फेरीवाले, हातगाडीवाले दिवसभर उभे राहतात. त्यामुळे दुकानात खरेदीसाठी येणाºया ग्राहकाने आपले वाहन नेमके कुठे उभे करावे, अशी समस्या निर्माण झाली आहे. एका दुकानात जायचे असेल तर शेजारील दुकानदार आपल्या दुकानापुढे वाहन उभे करू देत नाही. दुकानदार येणाºया ग्राहकांच्या वाहन पार्किंगची चिंता करताना दिसत नाही. ग्राहकाने आपल्या सोईने पार्किंग करून दुकानात खरेदीसाठी यावे, अशी दुकानदाराची अपेक्षा राहते.
हॉकर्स-फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे संपूर्ण शहरात पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. सायंकाळी बाजारपेठेत फेरफटका मारला असता दिवाळीसाठी खरेदीला येणाºयांची गर्दी वाढू लागली आहे. फेरीवाले मुख्य बाजारपेठेतून हटविल्यास पार्किंगची समस्या काही अंशी कमी होण्याची चिन्हे आहेत.
आधीच गर्दी, त्यात दुकानदाराचे रस्त्यावर आलेले साहित्य, त्यापुढे हॉकर्स-फेरीवाल्यांचा ठिय्या, त्यामुळे व्यापला गेलेला अर्धा रस्ता, त्यापुढे करावी लागणारी पार्किंग आदी बाबींमुळे वाहतुकीची कोंडी बाजारपेठेत होत आहे.
या गर्दीमुळे धक्का लागणे, त्यातून भांडणे होणे, प्रकरण मारहाणीपर्यंत जाऊन पोलीस ठाण्यात पोहोचणे, त्यातून दिवाळी खराब जाणे, असे प्रकार सुरु आहे. त्यातच वाहतूक पोलिसांच्या ‘कामगिरी’ची भर पडते आहे. बाजारातील गर्दी नियंत्रित करण्याऐवजी वाहतूक पोलीस वाहन उचलून नेणे, चलान फाडणे यावर भर देत असल्याचे चित्र आहे. नगरपरिषद, वाहतूक पोलीस, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसते आहे. बाजारातील दुकानदारांचे साहित्य आत ठेऊन, हॉकर्स-फेरीवाले हटविले तरी अतिक्रमण व पार्किंगची ही समस्या निकाली निघू शकते, अशी स्थिती आहे. मात्र त्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी कोणताही पुढाकार घेताना दिसत नाही. अशीच स्थिती तालुका मुख्यालयी आणि मोठ्या गावांमधील बाजारपेठेमध्ये असण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक अशा मोठ्या खरेदीच्या वेळी पालिका व पोलिसांनी शहरातील मोकळ्या मैदानात पार्किंगची मोफत व्यवस्था करणे व वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने त्यासाठी पुढाकार घेताना कुणी दिसत नाही.
वाहतूक पोलिसांची कारवाई बसस्थानकातच
यवतमाळ शहर व बाजारपेठेत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे वाहतूक पोलीस यवतमाळच्या बसस्थानकावर मात्र पाच-दहा मिनिटांसाठी नातेवाईकांना सोडायला आलेल्या वाहनधारकांचे वाहन जप्त करून मर्दुमकी दाखविताना दिसतात. दहा मिनिटासाठी आल्याने वाहन नियोजित पार्किंगमध्ये लावणे, त्यासाठी पैसा व वेळ खर्ची घालणे परवडत नाही. म्हणून अनेक जण बसस्थानक परिसरात दुचाकी उभी करून नातेवाईकांना एसटीपर्यंत सोडायला जातात. त्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटात निघून जातात. मात्र नेमक्या याच काळात वाहतूक पोलिसांची टोर्इंग वाहन येऊन ही वाहने उचलून नेली जातात. वाहनधारक समोर उभा असूनही त्याचे वाहन बळजबरीने ट्रकमध्ये टाकले जाते. त्याला वाहतूक कार्यालयात बोलावून चलान दिले जाते. या दरम्यान वाहनाचे अनेकदा नुकसानही होते. मात्र अवघ्या पाच-दहा मिनिटांसाठी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. वर्षानुवर्षांपासून बसस्थानकावरुन वृत्तपत्राचे वितरण करणाºया विक्रेत्यांनासुद्धा कित्येकदा या कारवाईचा सामना करावा लागला. एसटी बसस्थानकातील एका व्यक्तीच्या इशाºयावरुन वाहतूक पोलीस वाहन जप्तीची ही कारवाई करीत असल्याचे सांगितले जाते. आपले आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून सदर व्यक्ती सतत वाहतूक पोलिसांना वाहन जप्तीसाठी या म्हणून फोन करतो, पोलीस न आल्यास त्यांना वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देतो. अखेर वाहतूक पोलीसही नाईलाजाने हजर होतात. पोलीसही या व्यक्तीच्या दहशतीत दिसतात. त्यामुळे ते नेहमी त्याच्या बाजूनेच ‘स्टॅन्ड’ राहतात. पाच-दहा मिनिटासाठी का होईना, येणाºया वाहनांचा ‘लाभ’ आपल्यालाच मिळावा, असा त्या व्यक्तीचा प्रयत्न राहत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या वर्तुळातूनच सांगण्यात आले.
एसटी बसस्थानक-बाजारात खिसेकापू, मंगळसूत्र चोर सक्रिय
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलताच खिसेकापू, मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत आणि ग्रामीण जनतेला बसस्थानकावर किंवा एसटी प्रवासात गाठून हात मारण्याची संधी चोरटे सोडणार नाहीत. ते पाहता पोलिसांनी आतापासूनच साध्या वेषातील महिला व पुरुष कर्मचारी बाजारपेठेत तैनात करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Encryption breaks in Diwali market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.