देवळातला प्रवीण अखेर वसतिगृहात आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 08:47 PM2018-11-02T20:47:02+5:302018-11-02T20:48:22+5:30
त्याच्याजवळ बुद्धिमत्ता आहे, शिकण्याची धडपड आहे. फक्त राहण्यासाठी खोली नव्हती. वसतिगृहाच्या नियमात तो बसला नव्हता. म्हणून ऐन बारावीच्या वर्षात तो मंदिरात राहून शिकला. त्याची व्यथा ‘लोकमत’ने समाजापुढे मांडल्यावर शासनाने त्याची दखल घेतली असून जीआर निर्गमित करून त्याला वसतिगृहात प्रवेश दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : त्याच्याजवळ बुद्धिमत्ता आहे, शिकण्याची धडपड आहे. फक्त राहण्यासाठी खोली नव्हती. वसतिगृहाच्या नियमात तो बसला नव्हता. म्हणून ऐन बारावीच्या वर्षात तो मंदिरात राहून शिकला. त्याची व्यथा ‘लोकमत’ने समाजापुढे मांडल्यावर शासनाने त्याची दखल घेतली असून जीआर निर्गमित करून त्याला वसतिगृहात प्रवेश दिला आहे.
प्रवीण रामदास राठोड असे या विद्यार्थ्याचे नाव. त्याचे मूळ गाव घाटंजी तालुक्यातील आंबेझरी. दहावीपर्यंत त्याला मोहद्याच्या (ता. पांढरकवडा) शाळेत पायी जावे लागले. तरीही दहावीत त्याने ८७ टक्के मिळविले. नंतर तो यवतमाळात शिक्षणासाठी आला. गेल्यावर्षी तो बारावीला होता. पण शासकीय वतिगृहात त्याला प्रवेश मिळू शकला नाही. भाड्याची खोली करण्याएवढी त्याची परिस्थितीच नव्हती. त्यामुळे येथील मानवता मंदिरात त्याने आश्रय घेतला.
त्याची ही धडपड ‘लोकमत’ने १९ सप्टेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध केली. ‘शेतकऱ्याच्या मुलावर मंदिरात राहण्याची वेळ’ हे वृत्त प्रकाशित होताच अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. त्याचवेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी प्रवीणच्या निमित्ताने अशा होतकरू मुलांची व्यथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना सांगितली. सामाजिक न्याय विभागाने बुधवारी एक शासन निर्णयच जारी केला. त्यानुसार, प्रवीणला ‘विशेष बाब’ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश दिला आहे. सध्या प्रवीण अमोलकचंद महाविद्यालयात बीएस्सी करतोय.