पाळण्याचा फास लागून चिमुकल्याचा करूण अंत
By admin | Published: December 24, 2015 03:00 AM2015-12-24T03:00:14+5:302015-12-24T03:00:14+5:30
पाळण्यावर झोके घेताना फास लागून एका नऊ वर्षीय बालकाचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना येथील अशोकनगरात बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
हृदयद्रावक : नेरच्या अशोकनगरातील घटना
नेर : पाळण्यावर झोके घेताना फास लागून एका नऊ वर्षीय बालकाचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना येथील अशोकनगरात बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. मजुरीवरून आई-वडील घरी परत आल्यानंतर ही घटना सायंकाळी उघडकीस आली.
शुभम श्रीकृष्ण लोंढे (९) असे मृत बालकाचे नाव आहे. तो नेर येथील नगरपरिषद शाळेचा तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मधल्या सुटीत तो घरी आला. आई-वडील मजुरीला गेल्याने घरी कुणीही नव्हते. घरात बांधलेल्या पाळण्यावर तो झोके घेऊ लागला. झोके घेताना अचानक त्याला फास लागला आणि काही कळायच्या आतच मृत्यू झाला. आसपास कुणीही नसल्याने हा प्रकार तत्काळ कळला नाही. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याचे आई-वडील कामावरून परत आले तेव्हा शुभम पाळण्याच्या दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हा प्रकार पाहून त्यांनी आरडाओरडा केला. परिसरातील नागरिकही धावून आले. प्रत्येक जण हळहळताना दिसत होता. आईचा आक्रोश सर्वांचे हृदय हेलावून टाकत होता. (तालुका प्रतिनिधी)