भारत उभा करावयाचा असेल तर जातीयवाद संपवा
By admin | Published: April 12, 2017 12:09 AM2017-04-12T00:09:11+5:302017-04-12T00:09:11+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व देशभक्तीचे होते. त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची सांगड भारतीय संविधानात घातली.
श्रीपाल सबनिस : पुसद येथे आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील चौथे प्रबोधन पुष्प, श्रोत्यांचा प्रतिसाद
पुसद : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व देशभक्तीचे होते. त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची सांगड भारतीय संविधानात घातली. राज्यघटनेत सर्वांना स्वातंत्र्य आहे. बाबासाहेबांच्या कर्तृत्व व नेतृत्वामुळे संपूर्ण जग प्रभावीत झाले होते. बाबासाहेबांचा जन्म जरी भारतात झाला असला तरी त्यांच्या बौद्धीक विकास हा उदारमतवादी राष्ट्रांमध्ये झाला. धर्म हा न्याय देणारा व दु:खातून मुक्त करणारा असतो. मात्र हिंदू धर्माने बाबासाहेबांना छळले. भारत उभा करावयाचा असेल तर जातीयवाद संपला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.श्रीपाल सबनिस यांनी केले.
पुसद येथे आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील चौथे प्रबोधन पुष्प पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब जयंती उत्सव समितीच्यावतीने स्थानिक पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वानिमित्त आयोजित प्रबोधनातील ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी दीपक आसेगावकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.आशीष देशमुख, डॉ.भानुप्रकाश कदम, डॉ.उत्तम खांबाळकर, मिलिंद दहेकर, ललिता सबनिस, डॉ.राजेश गाढवे, गोवर्धन मोहिते, प्रमोद सोनटक्के आदींची उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी समितीचे मिलिंद हट्टेकर, महेश खडसे, अनिल हट्टेकर, प्रा.विलास भवरे, प्रा.महेश हंबर्डे, विलास खडसे, समाधान केवटे, रामदास कांबळे, मनोज खिराडे, साहेबराव गुजर, अशोक वाहुळे, भगवान हनवते, भारत अंभोरे, बाळासाहेब कांबळे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)