कलासक्त मनांना प्रेरणास्थळावर मिळाली नवनिर्मितीची ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 06:00 AM2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:06+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ‘प्रेरणास्थळी’ शनिवारी सकाळी हा कलासक्त माणसांचा मेळा भरला होता. ताडोबा (चंद्रपूर) येथील इरई सफारी रिट्रीटमध्ये जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने जवाहरलाल दर्डा स्मृती आर्ट कॅम्प पार पडला. देशातील सुप्रसिद्ध कलावंत यात सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विविध क्षेत्रात स्वत:ची अमिट छाप सोडून गेलेल्या बाबूजींचा देशातील अनेक कलावंतांवरही प्रभाव आहे. त्याच ओढीतून देश-विदेशात विख्यात असलेल्या चित्रकारांनी प्रेरणास्थळावर येऊन बाबूजींच्या समाधीला नमन केले. येथील निसर्गरम्य वातावरणाने आणि बाबूजींच्या पावन स्मृतींनी नवी उर्जा मिळाल्याची तृप्त भावना या कलावंतांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ‘प्रेरणास्थळी’ शनिवारी सकाळी हा कलासक्त माणसांचा मेळा भरला होता. ताडोबा (चंद्रपूर) येथील इरई सफारी रिट्रीटमध्ये जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने जवाहरलाल दर्डा स्मृती आर्ट कॅम्प पार पडला. देशातील सुप्रसिद्ध कलावंत यात सहभागी झाले. शनिवारी सकाळी या कलावंतांनी यवतमाळात धाव घेत बाबूजींची समाधी असलेल्या प्रेरणास्थळाला भेट दिली. त्यानंतर मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या समाधीस्थळीही भेट दिली.
या कलावंतांमध्ये विनोद शर्मा, शोभा ब्रुटा, काहिनी अर्ते मर्चंट, सूर्यकांत लोखंडे, आनंद पांचाळ, मनिष पुष्कळे, संजय सोनपिंपरे, विजेंद्र सिंह, एम. नारायण, दीपक शिंदे, स्विटा राय, तेजींदर कांडा, वाहिदा अहमद, प्राजक्ता पालव, सुहास बाहुलकर, साधना बाहुलकर आदींचा समावेश होता. त्यांचे आगमन होताच लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी पुष्पहाराने स्वागत केले. यावेळी माजी आमदार कीर्ती गांधी, लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, लव दर्डा, सोनाली दर्डा, विलास देशपांडे, सुभाष यादव उपस्थित होते.
प्रेरणास्थळ ‘रिअली इन्स्पायरिंग’
बाबूजींच्या समाधीपुढे नतमस्तक होतानाच नामवंत चित्रकारांनी प्रेरणास्थळावरील वनराई, हिरवाई आदींची नवलाई मनात भरून घेतली. तेथील निवांतपणा मनात साठवून घेतला. ‘इस नैसर्गिक क्षेत्र में आकर अत्यंत सुखद अनुभूती हुई’, ‘व्हिजिटींग टू प्रेरणास्थळ इज रिअली इन्स्पायरिंग’ असा शेरा लिहून हे कलावंत रवाना झाले. अन् जाताना यवतमाळला पुन्हा-पुन्हा येण्याची इच्छाही घेऊन गेले!
स्थानिक कलावंतांनी घेतली धाव
देशभरात ख्याती मिळविलेले प्रतिभावंत चित्रकार प्रेरणास्थळावर येत असल्याचे कळताच यवतमाळातील स्थानिक कलावंतांनीही त्यांच्या भेटीसाठी धाव घेतली. अरुण लोणारकर, संजय सांबजवार, प्रदीप गज्जलवार, भूषण मानेकर, महेश ठाकरे, राजश्री कुलकर्णी, आदिती भिष्म, अभिजित भिष्म, रंजित वनकर या स्थानिक कलावंतांनी इतर राज्यातून, इतर शहरातून आलेल्या नामवंतांशी चर्चा करून चित्रकारितेतील विविध बारकावे जाणून घेतले. कलासक्त मनांनी अनुभवांचे, कल्पनांचे देवाण-घेवाण केली. कलाकारांची-कलाकारांनी घेतलेली ही मुलाखत अनेकांसाठी चिरस्मरणीय ठरली.