गृहमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:10 PM2018-12-17T22:10:18+5:302018-12-17T22:10:56+5:30
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी तमाम अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा, असे निर्देश अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी ठाणेदारांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी तमाम अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा, असे निर्देश अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी ठाणेदारांना दिले आहेत.
सोमवारपासून जिल्हा पोलीस प्रशासनाचे महानिरीक्षकांकडून वार्षिक निरीक्षण सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी श्रीकांत तरवडे यांनी गुन्हे आढावा बैठक घेतली. त्यात वाढती गुन्हेगारी, गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यात येणारे अपयश, डिटेक्शनचे घटलेले प्रमाण, गुन्हे शाबिती व शिक्षेच्या प्रमाणात झालेली घट, त्यासाठी कारणीभूत ठरत असलेले सदोष दोषारोपपत्र, क्रियाशील गुन्हेगारांवरील प्रतिबंधात्मक कारवाई, आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी अशा विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. सहायक फौजदाराच्या खुनातील आरोपी २१ दिवसानंतर का होईना गजाआड झाल्याबाबत बैठकीत समाधानही व्यक्त करण्यात आले.
गृहराज्यमंत्र्यांना अवैध धंदे बंद हवे आहेत, त्यांच्या आदेशाचे पालन व्हावे, जिल्ह्यात कुठेही अवैध प्रवासी वाहतूक, मटका, जुगार, क्रिकेट सट्टा, क्लब, कोंबडबाजार, अवैध दारू, अंमली पदार्थांची तस्करी, प्रतिबंधित गुटखा विक्री, शस्त्र विक्री या सारखे अवैध धंदे चालविले जाऊ नये, असे कुठे आढळल्यास संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे महानिरीक्षकांनी बैठकीत ठाणेदारांना बजावले. गृहराज्यमंत्र्यांनी हे धंदे सुरू आहेत की नाही, हे तपासण्याची जबाबदारी महानिरीक्षकांवर सोपविली होती. ते प्रत्यक्ष तपासणी करतात का याकडे नजरा लागल्या आहेत.
परेड निरीक्षण आणि मुलाखती
प्रभारी पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी सोमवारी पळसवाडी कॅम्प स्थित पोलीस ग्राऊंडवर जिल्हाभरातील ठाणेदार व पोलीस अधिकाऱ्यांच्या परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी ऐकून घेतल्या. पुढील पाच दिवस जिल्ह्याच्या विविध भागात महानिरीक्षकांचे हे वार्षिक निरीक्षण चालणार आहे. त्यात तीन पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये आणि विविध शाखांचा समावेश आहे.