अभियंता तरुणाने नफ्यात आणली शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 10:17 PM2018-02-02T22:17:51+5:302018-02-02T22:18:10+5:30
शेतीत काही उरत नाही, असे म्हणत शेतकऱ्यांची मुले शेतीकडे पाठ फिरवित आहे. अशा काळात एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाने मात्र शेतीतून ३ हजार रुपये रोज कमाई करण्याचा मार्ग शोधला आहे.
किशोर वंजारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शेतीत काही उरत नाही, असे म्हणत शेतकऱ्यांची मुले शेतीकडे पाठ फिरवित आहे. अशा काळात एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाने मात्र शेतीतून ३ हजार रुपये रोज कमाई करण्याचा मार्ग शोधला आहे. जिल्ह्यातील शेतकरी सहसा निवडत नाही, असा फुलशेतीचा मार्ग त्याने चोखाळला. श्रेणिक रमेशचंद्र सिंगवी या तरुणाची शेती पाहण्यासाठी आता मोझर गावात शेतकऱ्यांची रिघ लागत आहे.
तालुक्यातील मोझर येथील सुरजमलजी सिंगवी हे स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या मित्र परिवारातील एक होते. त्यांचा नातू श्रेणिक रमेशचंद्र सिंगवी (२३) हा संत गाडगेबाबा विद्यापीठातून २०१६ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला. पण शेतीत क्रांती आणण्याची त्याची जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. यातच त्याने शेतात पोल्ट हाउसची उभारणी केली. यात त्याने अरबेला या फुलांची लागवड केली. आज या फुलशेतीला बहर आला आहे. अरबेरा आठ विविध रंगात बहरते. नागपूर, पुणे, कारंजा, हैदराबाद येथील फुल व्यापारी या अत्यंत देखण्या फुलांची थेट मागणी करीत आहेत. आकर्षक पॅकिंगमध्ये ही फुले तेथील बाजारपेठेत जातात. त्यातून रोज चार ते पाच हजार रुपयांचे उत्पन्न होत आहे. आगामी काळात हे उत्पन्न पाच ते सहा हजार होण्याची शक्यता आहे.
आता फळबागेचा मानस
सॉफ्टवेअर अभियंता असताना विविध प्रकारची फुले श्रेणिक फुलवित आहे. आता फळबाग फुलविण्याचा त्याचा मानस आहे. पिता रमेशचंद्र आणि आई किरण आपल्या लेकाच्या मेहनतीला पाठबळ देत असतात. श्रेणिकची फुलशेती इतर युवा शेतकºयांना नवा आॅक्सिजन देणारी ठरत आहे.