भूमाफियांविरुद्ध अभियंत्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:44 PM2018-07-13T23:44:20+5:302018-07-13T23:45:27+5:30
साडेअकरा लाखांचे चेक बाऊंस झाल्याच्या प्रकरणात येथील एका सेवानिवृत्त अभियंत्याने मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षासह भूमाफिया व एका डॉक्टरविरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : साडेअकरा लाखांचे चेक बाऊंस झाल्याच्या प्रकरणात येथील एका सेवानिवृत्त अभियंत्याने मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षासह भूमाफिया व एका डॉक्टरविरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. परंतु महिनाभरापासून पोलीस त्या प्रकरणात गुन्हा नोंदविणे टाळत आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या एका अभियंत्याला मंगेश व राकेश यांनी निशाणा बनविले. त्यांच्या या कारनाम्यात विदर्भ हाऊसिंग परिसरातील डॉक्टर म्हणून ओळखला जाणारा एक व्यक्तीही भागीदार आहे. रोजच्या बैठकीतील असल्याने अभियंत्याने त्यांच्याशी व्यवहार केला. हा व्यवहार उलटल्याने मंगेशने अभियंत्याला चार लाखांचा तर त्या डॉक्टरने साडेसात लाखांचा एका मल्टीस्टेटचा धनादेश दिला. परंतु हे दोनही धनादेश खात्यात पैसेच नसल्याने बाऊंस झाले. चार लाखांचा धनादेश अभियंत्याला बँकेतून परत मिळाला. परंतु साडेसात लाखांचा धनादेश मंगेशने त्या मल्टीस्टेट बँकेत स्वत:च स्वाक्षऱ्या करुन परस्पर ताब्यात घेतला. हा गैरप्रकार पुढे आल्यानंतर सदर अभियंत्याने त्या मल्टीस्टेटला नोटीस बजावली. मात्र त्यांनी हातवर केल्याने अखेर महिनाभरापूर्वी मल्टीस्टेटचे अध्यक्ष, मंगेश व त्यांचा साथीदार डॉक्टर अशा तिघांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु अद्याप त्यावर गुन्हा दाखल न केल्याने यामागील ‘रहस्य’ कायम आहे. तर अभियंत्याच्या सांगण्यावरूनच हा धनादेश मंगेशला परत देण्यात आल्याचा मल्टीस्टेटचा दावा आहे.
मंगेशची मंत्रालयात बैठक
काँग्रेसचा कार्यकर्ता असलेल्या मंगेशची सातत्याने मुंबई व मंत्रालयात ये-जा सुरू राहते. एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी त्याची कौटुंबिक जवळीक आहे. आपली पहिली पत्नी मंत्रालयात डेस्क आॅफीसर असल्याचे सांगून तो तिचा फोटोही खिशात बाळगतो. याच माध्यमातून त्याने मुंबईतही अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोहारा-वाघापूर बायपासवरील भूखंडावर नागपूरच्या बँकेतून कर्ज
भूमाफिया राकेश व मंगेशचे कारनामे यवतमाळ शहरात अल्पावधीतच चर्चेत आल्याने अनेक बँकांनी त्यांना संपत्ती तारण ठेऊन कर्ज देणे बंद केले. म्हणून त्यांनी नागपुरातील एका बँकेतून दोन ते अडीच कोटींचे कर्ज उचलल्याची चर्चा बाजारपेठेत आहे. त्यांनी लोहारा ते वाघापूर बायपासवर रेल्वे क्रॉसिंगनजीक २५ हजार चौरस फुटाचे दोन भूखंड बनावट मालक उभा करून राकेशच्या नावाने खरेदी केले. या भूखंडाचा मालक अद्यापही अनभिज्ञ आहे. याच भूखंडावर त्यांनी नागपूरच्या बँकेतून कर्ज मिळविल्याचे सांगितले जाते.
महसूल, पोलीस अधिकाऱ्यांशी उठबस
काँग्रेसचा पदाधिकारी व राजकीय संरक्षण मिळालेल्या मंगेशची अधिकाऱ्यांसोबतही उठबस होती. २०१६ मध्ये पोलीस दलातील एक ‘स्थानिक’ अधिकारी तसेच महसूल विभागातील तत्कालीन ‘अपर’ अधिकाऱ्याला मंगेशने आपला निशाणा बनविल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला त्यांच्याशी उठबस वाढविली व नंतर त्यांचीच शिकार केली. पोलीस अधिकाऱ्याला बरीच मोठी टोपी दिल्याचे सांगितले जाते. याच मंगेशने पोलिसातील विजय नामक आर्थिक व्यवहार सांभाळणाºया कर्मचाºयालाही फसविले.
अभियंता, डॉक्टरलाही शिकार बनविले
मंगेश व राकेश या भूमाफियाने यवतमाळातील एक डॉक्टर, अभियंता, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी अशा अनेकांना शिकार बनविले. दारव्हा रोडवरील आॅटोडिल व फायनान्सरला वर्धेतील ईनोव्हा गाडीच्या विक्रीतून एक लाखांची टोपी दिली होती. मात्र वेळीच सावरल्याने ही रक्कम वाचली. याच मार्गावरील अन्य एका फायनान्सरचेसुद्धा मंगेश सोबत सलोख्याचे संबंध असल्याचे सांगितले जाते. मंगेशने पांढरकवड्यातील रणजित, येथील राजेश, अन्वर, आनंद, स्टेट बँक चौकातील प्रवीण, प्रॉपर्टी व्यवसायातील दादाराव, अनुप, पोलीस विजय अशा अनेकांना आपला शिकार बनविले आहे.