ऐन दिवाळीत ‘कुणबी’ इतिहासाचे खोदकाम, कर्मचारी लागले कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 02:15 PM2023-11-10T14:15:51+5:302023-11-10T14:18:29+5:30
शाळेतले जनरल रजिस्टर, कारागृहातील नोंदींचीही पडताळणी
यवतमाळ : दिवाळीच्या सुट्या एन्जाॅय करण्याच्या मूडमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांवर अचानक ‘कुणबी’ इतिहास शोधण्याचे काम येऊन पडले आहे. मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य शासनाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात समिती नेमली आहे. या समितीने जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांमधील जुन्या कागदपत्रांची पडताळणी करून ‘कुणबी’ नोंदीचा अहवाल मागविला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावरून सर्वच कार्यालयातील कर्मचारी सध्या जुन्या फाईलींचे बाड घेऊन तपासणी करण्याच्या कामात गर्क आहेत.
जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी ४ नोव्हेंबर रोजीच व्हीसी घेऊन सर्व विभाग प्रमुखांना याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, नगर परिषद कार्यालय, पंचायत समिती शिक्षण विभाग आदी ठिकाणी जुन्या अभिलेखांची तपासणी युद्धपातळीवर केली जात आहे. सन १९४८ ते १९६७ या कालावधीचे हक्कनोंदणी, फेरफार, पेरेपत्रक, कोतवाल बुक नक्कल आदी तपासले जात आहे. तसेच सर्व शाळांमधील जनरल रजिस्टर, कारागृहातील नोंदीही तपासल्या जात आहेत. उपनिबंधक कार्यालयातील नोंदीही तपासल्या जात आहेत. न्या. संदीप शिंदे यांची समिती लवकरच जिल्ह्यात दाखल होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्व कार्यालयातील कुणबी नोंदीचा अहवाल १० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पुसदमध्ये आतापर्यंत ३८१ कुणबी नोंदी आढळल्या
पुसद तहसीलमध्ये तब्बल तीन लाख ९१ हजार ७४६ अभिलेखे तपासण्यात आलीत. त्यामध्ये ३२१ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या. पंचायत समिती शिक्षण विभागात प्रवेश निर्गम नोंदवहीतील १३ हजार ६९८ नोंदी तपासल्यावर ६० कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या. नगर परिषद कार्यालयातील ११ हजार ४१८ नोंदी तपासण्यात आल्या. तसेच येथील भूमिअभिलेख कार्यालयातील टिपण बुकातील ३ हजार २८३ नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये कुणबी जातीची नोंद आढळून आली नाही. पुसद तालुक्यात मागील तीन दिवसात सर्व कार्यालयात तब्बल ४ लाख २० हजार १४५ कुणबी जातीच्या नोंदी तपासण्यात आल्या असून आतापर्यंत ३८१ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या. उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार महादेव जोरवर, नायब तहसीलदार गजानन कदम, रवि तुपसुंदरे व रशीद शेख, अव्वल कारकून जय राठोड आदींच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू आहे. बऱ्याच अभिलेखांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी दिसून येत असल्याचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी सांगितले.
जुन्या फाईलचे गठ्ठे धूळ अटकून आले बाहेर
राळेगाव उपविभागातही कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महसूल कर्मचारी दिवस-रात्र एक करून सेवा देत आहेत. जुन्या दस्तऐवजांचे गठ्ठे बाहेर काढण्यात आले आहेत. हक्क नोंदणी, जातीचे दाखले आदी महसुली पुरावा शोधण्याकरिता उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे यांनी स्वतः कर्मचाऱ्यांकडून जुने दप्तर शोधून मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी पडताळणीचे काम सुरू केले आहे. महसूल कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी याकरिता दप्तर घेऊन तहसीलमध्ये ठाण मांडून बसले आहेत.