दुर्गे दुर्घट भारी... काळजीच्या काळातही यवतमाळच्या नवरात्रौत्सवात उत्साह 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 09:36 PM2020-10-23T21:36:38+5:302020-10-23T21:37:26+5:30

Yavatmal : देव आणि भक्ताच्या मनात अंतर नसतेच. सध्या कोरोनामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याची गरज लक्षात घेता, भाविकांनी अंतर राखलेही. पण अंत:करणातल्या देवाने त्यांना तसूभरही अंतर दिलेले नाही.

Enthusiasm in Navratra festival of Yavatmal even in times of worry | दुर्गे दुर्घट भारी... काळजीच्या काळातही यवतमाळच्या नवरात्रौत्सवात उत्साह 

दुर्गे दुर्घट भारी... काळजीच्या काळातही यवतमाळच्या नवरात्रौत्सवात उत्साह 

Next

यवतमाळ: दुर्गादेवीच्या मूर्तीसोबत राक्षसाची प्रतिमाही असतेच. पण यंदा मातीच्या राक्षसासोबत कोरोनाचा राक्षसही ठाण मांडून बसलेला आहे. ऐन उत्सवाचा काळ काळजीचा काळ बनला आहे. पण भाविकांचा भोळा भाव त्याही संकटाचा कर्दनकाळ ठरल्याची प्रचिती सध्या यवतमाळच्या प्रसिद्ध दुर्गोत्सवात येतेय.

देव आणि भक्ताच्या मनात अंतर नसतेच. सध्या कोरोनामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याची गरज लक्षात घेता, भाविकांनी अंतर राखलेही. पण अंत:करणातल्या देवाने त्यांना तसूभरही अंतर दिलेले नाही. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक दुर्गादर्शनासाठी यवतमाळात दाखल होत आहेत. विविध सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींपुढे नतमस्तक होताना आपण कोरोनाला नक्कीच हरवू, हा विश्वास आणखी दुणावत आहे. 

देशात कोलकात्यानंतर यवतमाळच्या दुर्गोत्सवाला दुसरे स्थान दिले जाते. त्याचे पहिले कारण येथील मूर्तिकारांनी घडविलेल्या ‘जिवंत’ मूर्ती आणि दुसरे महत्त्वाचे कारण आहे त्या मूर्तींवर अपार श्रद्धा ठेवणाºया भाविकांची लक्षावधी संख्या. प्रत्येक चौक या काळात आकर्षक देखाव्यांनी सजलेला आहे. देवीच्या भक्तीगीतांनी वातावरण भारून टाकलेय. अर्ध्या किलोमीटरच्या आत दहा दुर्गादेवी मूर्ती पाहण्याचा अलभ्य लाभ केवळ यवतमाळातच मिळतो. त्यातही प्रत्येक देवीपुढचा देखावाही यवतमाळकरांच्या कलासक्त हृदयाचा परिचय देणारा अन् पाहणाºयांच्या हृदयाचा ठाव घेणारा. 

त्यामुळे दरवर्षी येथे जिल्हाभरातून अन् जिल्ह्याबाहेरूनही भाविक येतात. रात्रभर शहरभर पायी फिरून देवदर्शन करतात. पण दरवर्षीचा हा भाविकांचा गोतावळा यंदा रोखण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागले. गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याची दक्षता घेतली जात आहे. प्रशासनाला साथ देत भाविकांनी यंदा समंजसपणे दर्शनाचा लाभ घेणे सुरू केले आहे. भक्ती ही डोळसच असते, याचा जणू यवतमाळकर पुरावाच ठरले आहे. म्हणूनच दरवर्षीच्या मूर्तिकलेसोबत भाविकांच्या श्रद्धेमुळे यंदाच्या नवरात्रौत्सवातही यवतमाळ नगरी तिर्थस्थळच बनलेय.

Web Title: Enthusiasm in Navratra festival of Yavatmal even in times of worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.