यवतमाळ जिल्ह्यातील वणीत अख्खी अंत्ययात्राच झाली क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 08:13 PM2020-07-28T20:13:52+5:302020-07-28T20:15:43+5:30
आपण ज्या अंत्ययात्रेत गेलो, त्यातच एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले आणि साऱ्यांची पाचावर धारण बसली. तर घाम फुटलेल्या प्रशासनाने अख्खी अंत्ययात्राच क्वारंटाईन करून टाकली!
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लग्नघरी आणि मयतीला गेले पाहिजे असं गावखेड्यातलं चलन आहे. पण याच सौहादार्मुळे कधी-कधी आफत ओढवते. वणीत मंगळवारी तसेच झाले. जवळची व्यक्ती दगावली म्हणून अनेक जण त्याच्या अंत्ययात्रेत सामील झाले. पण आपण ज्या अंत्ययात्रेत गेलो, त्यातच एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले आणि साऱ्यांची पाचावर धारण बसली. तर घाम फुटलेल्या प्रशासनाने अख्खी अंत्ययात्राच क्वारंटाईन करून टाकली!
कोरोनाचे गांभीर्य आणि त्याबाबत सामान्य नागरिकांचा गाफिलपणा चव्हाट्यावर आणणारा हा प्रकार येथील चिखलगाव परिसरात घडला. येथील तेली फैल गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. याच भागातील कोरोना पॉझिटिव्ह महिला चिखलगावात येऊन अंत्ययात्रेत सहभागी झाली. या अंत्ययात्रेत चिखलगाव, कायर व घोन्सा येथील ६४ जणांचा समावेश होता.
सदर महिला प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडलीच कशी, असा प्रश्न आता चर्र्चिला जात आहे. वणी शहरातील तेली फैलात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. त्यामुळे १३ जुलैपासून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या परिसरात लागोपाठ कोरोनाचे रूग्ण आढळत आहे.
दरम्यान, २२ जुलैला या परिसरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याच दिवशी चिखलगाव येथे एका व्यक्तीचे निधन झाले. जी व्यक्ती पॉझिटिव्ह आली, तिच्या संपकार्तील एक महिला चिखलगावातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेसाठी गेली होती. २५ जुलैला या महिलेचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासन हादरून गेले. ही महिला कुणाकुणाच्या संपर्कात आली, याचा तपास सुरू असतानाच ती चिखलगावातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्याची बाब चौकशीत पुढे आल्याने प्रशासनाला घाम फुटला. तातडीने हालचाली करून अंत्यसंस्कारात कोण कोण सहभागी झाले, याचा शोध घेणे सुरू झाले. शोध सुरू असताना चिखलगाव, घोन्सा व कायर येथील एकूण ६४ जणांना प्रशासनाने परसोडा येथील कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन केले आहे. या साºया प्रकारामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
नागरिकांच्या बेजबाबदारीचा हा कळस आहे. वारंवार सांगूनही लोक ऐकत नाही. ही बाब कोरोना संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील ६४ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले.
- डॉ.शरद जावळे
उपविभागीय अधिकारी, वणी