दारव्हात उभारणार शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:26 AM2021-07-22T04:26:04+5:302021-07-22T04:26:04+5:30
फोटो मुकेश इंगोले दारव्हा : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. शहरात अनेक वर्षांपासून ...
फोटो मुकेश इंगोले
दारव्हा : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. शहरात अनेक वर्षांपासून याबाबत मागणी केली जात होती. आता पुतळा उभारण्यात येत असल्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
येथील शिवाजी स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर ९९ लाख ९६ हजार रुपये खर्च करून अत्यंत आकर्षक शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाणार आहे. या ठिकाणी दिमाखदार पुतळा विराजमान होईल. या प्रतिकृतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. परवानगीनंतर लवकरच महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या प्रवेशव्दाराचे बांधकाम व सौंदर्यीकरणाचे अंदाजपत्रक, आराखडा तयार करून प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाकडे सादर केला. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
या ठिकाणी दोन प्रवेशव्दार, दोन दीपमाळ, मधोमध चबुतरा, संरक्षक भिंत, पेवर ब्लॉक, बगिचा, विद्युतीकरण आदींसह विविध कामे करण्यात येणार आहे. संपूर्ण बांधकाम दगडात करण्यात येईल. सध्या दगड फोडले जात आहे. त्यानंतर या दगडांना घडविण्यासाठी खास लातूर येथून कारागीर बोलाविण्यात आले आहे. महाराजांचा पुतळा आणि आजूबाजूचे सौंदर्यीकरण शिवकालीन आणि ऐतिहासिक तसेच उत्तम कलाकृतीचा नमुना ठरावा यासाठी तसा लूक देण्याचा प्रयत्न केला जात आहे. खोदकाम सुरू करण्यात आले आहे. येत्या चार महिन्यात काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. ही वास्तू शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ठरणार आहे.
बाॅक्स
आमदार संजय राठोड यांचा पुढाकार
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या दारव्हा शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आमदार संजय राठोड यांनी पुढाकार घेतला. पालकमंत्री असताना त्यांनी क्रीडा संकुल प्रवेशव्दाराचे बांधकाम, सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावासाठी बांधकाम विभागाला सूचना दिल्या होत्या. खनिज विकासमधून निधी उपलब्ध करून दिला. ही संरचना तसेच पुतळा लक्षवेधक ठरावा, याकरिता विविध स्मारकांची पाहणी करून आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. पुतळ्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल करण्यात आला. विविध विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.