उरात अभिमान, डोळ्यात अश्रू
By admin | Published: September 20, 2016 01:47 AM2016-09-20T01:47:01+5:302016-09-20T01:47:01+5:30
घरी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतानाही त्याने देशभक्तीचे स्वप्न बाळगले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत
पुरडचा सुपुत्र विकास काश्मिरात शहीद : वीरपत्नी स्नेहावर दु:खाचा डोंगर
संतोष कुंडकर ल्ल पुरड (वणी)
घरी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतानाही त्याने देशभक्तीचे स्वप्न बाळगले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत तो सैन्यात भरती झाला. पाकिस्तानी सीमेलगत अतिरेक्यांशी लढता-लढता त्याला वीरमरण आले... तालुक्यातील पुरड गावातील या देशभक्ताचे नाव आहे विकास जनार्दन कुडमेथे (३१). काश्मिर खोऱ्यात उरी येथे आपल्या गावातील सुपूत्र शहीद झाल्याचे कळताच उर अभिमानाने भरुन आला पण डोळ्यांना मात्र अश्रूधारा लागल्या. शहीदपत्नी स्नेहा धाय मोकलून रडताना तिची वृद्ध आईही लेकीला विचारत होती, ‘तुझा राघू उडून गेला.. आता मैना तू काय करशील?’ हा प्रश्न उपस्थितांना हादरवून टाकत होता.
काश्मिरमध्ये भारतीय जवान शहीद झाल्याची वार्ता कळताच अख्खा जिल्हा शोकसागरात बुडाला. या शहिदांमध्ये आपल्याच जिल्ह्यातील विकास कुडमेथेही गेल्याचे कळताच दु:खाला पारावार उरला नाही.
देशासाठी प्राणाची बाजी लावणारा हा विकास कसा होता? तो होता गरीब कुटुंबातील हुशार अन् होतकरू मुलगा. वडील जनार्दन आणि आई विमल तसेच भाऊ राकेश मोलमजुरी करतात. बहीण मिरा विवाहित आहे. दहावी-बारावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन विकासने आयटीआयला प्रवेश घेतला होता. मात्र, जगायचे तर देशासाठी आणि मरायचे तर देशासाठीच, हा एकच ध्यास विकासने घेतला होता. त्याच्याच सुसंगतीमुळे गावातील इतरही मुलांना सैन्यात जाण्याचे ध्येय मिळाले होते. म्हणूनच विकास आणि गावातील अन्य दोन तरुणांची सैन्यात निवड झाली. विकास डोग्रा बटालियनमध्ये कार्यरत होते.
काश्मिरच्या उरी लष्करी तळावर ते रविवारी कर्तव्य बजावत असताना जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी हल्ला केला. तीन तासांच्या धुमश्चक्रीत अतिरेक्यांची धुळधाण उडविताना भारतीय जवानही शहीद झाले. लढता-लढता विकास कुडमेथे धारातीर्थी पडले. सोमवारी सकाळीच ही दुखद वार्ता पुरड गावात पोहोचली अन् सारा गाव शोकाकूल झाला.
विकासची १० महिन्यांची मुलगी जिज्ञासा सध्या आजारी आहे. त्यामुळे तिला घेऊन विकासची पत्नी स्नेहा वरोरा येथील रुग्णालयात गेली होती. वणीतील नागरिकांनी त्यांना पुरड गावात आणले. त्यावेळी त्यांनी जो हंबरडा फोडला तो हृदय हेलावून टाकणारा होता. दरम्यान, विकासचे पार्थिव सोमवारी रात्रीला नागपुरात पोहोचणार असून मंगळवारी सकाळी ९ वाजता पुरड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अतिरेकी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने १५ लाख रुपयांची मदत घोषित केली आहे.
पुरड हे बाराशे लोकसंख्येचे गाव वणी-मुकुटबन मार्गावर वणीपासून २४ किलोमीटर अंतरावर आहे. विदर्भा नदीच्या तिरावर वसलेल्या या गावात सोमवारी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनीही धाव घेतली. विकासच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो नागरिक पुरडकडे येत आहेत.
सासऱ्ऱ्याने केला होता प्रण
४१२ आॅक्टोबर १९८९ रोजी जन्मलेल्या विकासचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले. कोलगाव ता. मारेगाव येथील रामदास व प्रेमिला कुळसंगे यांची मुलगी स्नेहा विकासची अर्धांगिणी झाली. त्यांच्या संसारवेलीवर जिज्ञासा (वय १० महिने) नावाचे फुलही उगवले. दोन महिन्यांपूर्वीच विकास सुटीत गावात येऊन गेला होता. विकासच्या कर्तृत्वाने कुडमेथे कुटुंब आनंदात जगत असतानाच तो सर्वांना सोडून निघून गेला. शहीदपत्नी स्नेहाच्या दु:खाला पारावार उरला नाही. पण त्याचवेळी विकासच्या सासऱ्याचे शब्द साऱ्यांना धीर देत होते. विकासचे दिवंगत सासरे रामदास कुळसंगे हेही सैन्यात होते. त्यांनी प्रणच केला होता, माझी मुलगी देईल तर सैनिकालाच! विकाससारखा पराक्रमी सैनिक त्यांना जावई लाभला. तो देशासाठी शहीद झाला.