कोरोनामुळे दारव्हात रोटी बँकेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:28+5:30
शहरात बाहेरील अनेक कुटुंब अडकून पडले. सर्व व्यवसाय ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली. ही अवस्था बघून रोटी बँकेची संकल्पना पुढे आली. लॉकडाऊन असल्याने अनेकांना गावी परतता आले नाही. अनेक कुटुंब शहरात अडकून पडले. त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले. काहींनी तात्पुरती मदत केली. मात्र १५ दिवस काढायचे असल्याने चिंता वाढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : संचारबंदीमुळे कुणावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून शहरात रोटी बँकेची स्थापना करण्यात आली. यासाठी महिलांनी पुढाकार घेतला.
शहरात बाहेरील अनेक कुटुंब अडकून पडले. सर्व व्यवसाय ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली. ही अवस्था बघून रोटी बँकेची संकल्पना पुढे आली. लॉकडाऊन असल्याने अनेकांना गावी परतता आले नाही. अनेक कुटुंब शहरात अडकून पडले. त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले. काहींनी तात्पुरती मदत केली. मात्र १५ दिवस काढायचे असल्याने चिंता वाढली. व्यवसाय ठप्प असल्याने रोजमजुरी करणाऱ्यांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. ही अवस्था बघता येथील बंजारा कॉलनीतील नागरिक मदतीसाठी पुढे आले. अॅड. वैशाली हिरे यांनी ‘रोटी बँके’ची संकल्पना मांडली. त्याला महिला, पुरुषांनी होकार दिला.
पोलीस कर्मचारी शुभांगी ऊंबरे यांच्यामार्फत ठाणेदार मनोज केदारे यांच्याकडून परवानगी घेतली. नंतर घरोघरी जाऊन अन्नदान करण्याचे आवाहन केले. १ एप्रिलपासून कॉलनीतील सर्व महिला अॅड. वैशाली हिरे यांच्या घरी तयार करण्यात आलेल्या रोटी बँकेत दोन वेळा अन्न पदार्थ गोळा करतात. नंतर ते अन्न गरजूंपर्यंत पोहोचविले जाते. यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. अन्न देताना खबरदारी घेतली जाते.
या उपक्रमाकरिता अॅड. वैशाली हिरे, रंजना राठोड, कविता चावरे, कविता राठोड, नलिनी ठाकरे, रजनी खिराडे, मनू मापारे, छाया वानखडे, सुषमा मापारे, लता दुधे, प्रा. पद्मावती मेश्राम, बेबी राठोड, लता बुचके, शिला जाधव आदींनी पुढाकार घेतला. या उपक्रमाला विनोद राठोड, डॉ. रामधन हिरे, संजय ठाकरे, डॉ. चावरे, दीपक राठोड, किसन राठोड, संजय ठोकळे, भाऊ चव्हाण, सुदेश राठोड, भाऊ काळे, सुशील मापारे आदी सहकार्य करीत आहे.
मदतीसाठी सरसावले अनेक हात
मदतीकरिता अनेक जण पुढे येत आहे. किराणा साहित्य, बिस्कीट, पाणी, फळे आदींसह विविध वस्तुंचा पुरवठा करीत आहे. बंजारा कॉलनीत नागरिकांनी घरी स्वत: दोन वेळचे जेवण तयार करून ते सुरक्षितरित्या गरजूंंपर्यंत पोहोचविणे सुरू केले. गरिबांना मोठ्या अडचणीत दानशूर व्यक्तींमुळे दिलासा मिळाला. हा उपक्रम लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहील.