‘ईटीआय’ मशीनचा वाहकांना वैताग; कारवाईच्या भीतीने ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 05:00 AM2021-03-02T05:00:00+5:302021-03-02T05:00:07+5:30
माहूर आगारातील वाहकाने एसटी बसमध्येच गळफास लावून केलेल्या आत्महत्येने ईटीआयएम ऐरणीवर आली आहे. या वाहकाची मशीन बंद पडली. त्याचवेळी तपासणी पथक धडकले. त्यामुळे कारवाईत अडकलेल्या या वाहकाने आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, सुस्थितीतील मशीन वाहकांना मिळावी यासाठी एसटी प्रशासनाकडून तूर्तास तरी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न झालेले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एसटी महामंडळाने वापरात आणलेल्या ईटीआय मशीन आज वाहकांच्या जिवावर उठल्या आहेत. कालमर्यादा संपल्यानंतरही घासून घासून त्याच त्या मशीन वापरल्या जात असल्याने वाहक वैतागले आहेत. ही मशीन केव्हा बंद पडेल आणि वाहक तिकीट चोरीच्या गुन्ह्यात कसा अडकेल, याचा नेम राहिलेला नाही. याची भीती या कर्मचाऱ्यांना आहे.
माहूर आगारातील वाहकाने एसटी बसमध्येच गळफास लावून केलेल्या आत्महत्येने ईटीआयएम ऐरणीवर आली आहे. या वाहकाची मशीन बंद पडली. त्याचवेळी तपासणी पथक धडकले. त्यामुळे कारवाईत अडकलेल्या या वाहकाने आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, सुस्थितीतील मशीन वाहकांना मिळावी यासाठी एसटी प्रशासनाकडून तूर्तास तरी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न झालेले नाहीत. दररोज शेकडो मशीन बिघडण्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे दाखल होत आहेत. हे अधिकारी पाठपुरावा तेवढा करतात. मध्यवर्ती कार्यालयाने मात्र या विषयाला अजून तरी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.
वर्षभरात १२०० तक्रारी
ईटीआय मशीन साथ देत नसल्याच्या वर्षभरात यवतमाळ विभागात १२०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने तक्रारी होत असतानाही नवीन मशीन आणण्यासाठी कारवाई होत नाही.
महामंडळाने या मशीनमध्ये अनेक नवीन व्हर्जन टाकले आहेत. आधीच या मशीनची क्षमता संपलेली आहे. त्यात नवीन कामांचा भरणा झाला असल्याने या मशीन हँग होत असल्याच्या तक्रारी आहेत.
मशीनमध्ये अचानक बिघाड होऊन तिकीट देणे थांबल्यास आणि त्याचवेळी तपासणी पथक दाखल झाल्यास वाहकांवर कारवाई केली जाते. निलंबनासारख्या कारवाईत ते अडकतात.
वाहक म्हणतात...
ईटीआय मशीन बंद पडल्यास सुरू होण्यास वेळ लागतो. काही प्रसंगी स्टार्ट बटन दाबताना अधिक तिकीट बाहेर येतात. याचा भुर्दंड वाहकाला बसतो. ज्या गावचे तिकीट निघाले तेथील प्रवासी न मिळाल्यास रक्कम भरावी लागते.
- उत्तम अजमिरे, वाहक
मशीनमध्ये नवीन व्हर्जन आले आहे. बुकिंग करताना मशीन बंद पडल्यास एसटी बस थांबविता येत नाही. गर्दी असल्यास आणि त्याचवेळी पथक आल्यास वाहकाला दोषी ठरविले जाते. केस दाखल करून कारवाई केली जाते.
- अरुण काळे, वाहक
नवीन मशीनसाठी पाठपुरावा सुरू आहे
मागील काही वर्षांपासून ईटीआय मशीनची समस्या वाढली. बिघडलेल्या मशीन दुरुस्त करून वापरात आणल्या जातात. नवीन मशीनचा निर्णय मध्यवर्ती कार्यालयाकडून घेतला जातो. यासाठी पाठपुरावा होत आहे.
- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ