पुसदमध्ये भर रस्त्यावर भरतो आठही दिवस बाजार
By admin | Published: February 15, 2017 02:51 AM2017-02-15T02:51:44+5:302017-02-15T02:51:44+5:30
शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी असलेली छोटीमोठी दुकाने थेट रस्त्यावरच थाटली जात आहे.
जनावरांचा हैदोस : शहराच्या स्वच्छतेची ऐसीतैसी
पुसद : शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी असलेली छोटीमोठी दुकाने थेट रस्त्यावरच थाटली जात आहे. जणू आठही दिवस रस्त्याला आठवडी बाजाराचे स्वरूप येते. या बाजारात जनावरांचा मुक्त संचार असून, रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या केरकचऱ्याने शहराची स्वच्छता धोक्यात आली आहे.
शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील नागरिक विविध वस्तुंच्या खरेदीसाठी शहरात येतात. नागरिकांची गरज लक्षात घेऊन ठिकठिकाणी व्यापारी संकुलही बांधली आहेत. परंतु अलिकडे व्यापारी संकुलांऐवजी अनेकांनी आपली दुकाने थेट रस्त्यावर थाटली आहेत. त्यात भाजीपाला, फळे, रेडीमेट कापड, धान्य यासह इतर वस्तुंचा समावेश आहे. मुख्य रस्त्यालगतच ही दुकाने लावली जात आहे. खाद्य पदार्थांची दुकानेही दिसून येत आहे. शहराच्या भाजी मार्केट परिसरात हातगाडीवाले अर्ध्यारस्त्यापर्यंत ठिय्या मांडून असतात. विशेष म्हणजे, भाजी मार्केट असले तरी तेथे जायला कुणी तयार नसते. त्यामुळे विक्रेते रस्त्यावर दुकान मांडतात. या भाजी बाजारात जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे शहराची वाहतूक प्रभावित होते. आधीच बेशिस्त असलेल्या वाहतुकीने बाजार परिसरातील वाहतूक ठप्प होते. आॅटोरिक्षा, दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहने याच भागातून ये-जा करतात. त्यामुळे या परिसरात अपघाताहीची भीती असते. सुभाष चौकातील व्यापारी संकुलापुढे अनेक जण छोटे दुकान लावून बसतात. बसस्थानक ते शिवाजी चौक या परिसरातही मोठ्या प्रमाणात व्यावसायिक दिवसभर ठिय्या देऊन असतात. या सर्व प्रकाराकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर भरणाऱ्या बाजाराने ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते.
भाजीबाजारात तर सडलेला भाजीपाला थेट रस्त्यावर टाकल्या जातो. त्यावर मोकाट जनावरे तुटून पडतात. तसेच मोठ्या प्रमाणात धूळही या पालेभाज्यांवर बसते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. शहरात दररोज भरणाऱ्या या बाजारामुळे आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
(कार्यालय चमू)