स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही रस्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 05:00 AM2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:16+5:30
मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाचा कलंक सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष पूर्ण झालीत. तरीही मारेगाव तालुक्याच्या एका टोकावर असलेल्या कान्हाळगाव (वाई) या आदिवासीबहुल गावात अद्याप रस्ता पोहोचला नाही. त्यामुळे बाराही महिने मोठ्या यातना सहन करीत नागरिकांना ये-जा करावी लागते.
मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाचा कलंक सहन करावा लागत आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७३ वर्षे पुर्ण झालीत. गावाच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात.
पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा विविध योजना आल्या तरी कान्हाळगाव मुख्य रस्त्याला जोडले गेले नाही. गावापासून चार किलोमीटर अंतरावरून दोन पक्के जिल्हा मार्ग आहेत. परंतु या मार्गाला जोडणारा गावातून रस्ता नाही. जिल्हा मार्गावर पोहोचण्यासाठी गावातून दोन रस्ते आहेत. परंतु हे रस्ते जाण्यास योग्य नसून या रस्त्यावर नाले आहे. पावसाळ्यात या नाल्याला पूर येऊन गावाचा संपर्क बरेचदा खंडीत होत असतो.
गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शाळा आहे. त्यापुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते. परंतु गावाला बारमाही रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडतो. त्यामुळे रोजगाराचे प्रमाण गावात कमी आहे.
याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या, निवेदन दिले. परंतु आश्वासनापलीकडे ग्रामस्थांना काहीही मिळाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र प्रशासनाविषयी तीव्र असंतोष दिसून येत आहे.
निवडणुकीवर टाकला होता बहिष्कार
रस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वळविण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्या, अनेकदा निवदने दिली. परंतु फक्त आश्वाशिवाय जनतेच्या काहीही पदरात पडले नाही. शेवटी गावकऱ्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुका मतदानावर बहिष्कार टाकला. परंतु याचाही प्रशासनावर काहीही परिणाम झाला नाही. आता बेमूदत उपोषणाला बसू, अशा इशारा कान्हळगावच्या नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.
एकाकीपणाची भावना
आज सगळ्या गावात पक्के रस्ते पोहोचले. लोकांचे राहणीमान बदलले. प्रत्येक गावात वाहतुकीची साधने आली. मोटारसायकल आली, परंतु गावाला रस्ता नसल्याने गावात कोणत्याही सुविधा पोहोचल्या नाही. गावात जाण्यासाठी योग्य रस्ताच नसल्याने अधिकारी कर्मचारी येत नाही. गावात दोन शिक्षकी शाळा असून शिक्षक मिळत नाही. त्यामुळे गावकºयांत एकाकीपणाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या कामात लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सरपंच माया पेंदोर यांनी केली आहे.