पराभवानंतरही काँग्रेसचा ग्रामीण भागात वरचष्मा
By admin | Published: February 25, 2017 12:57 AM2017-02-25T00:57:00+5:302017-02-25T00:57:00+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल घोषित झाले. या निकालावरून नजर टाकल्यास अद्यापही ग्रामीण भागात
सर्वाधिक दुसऱ्या स्थानी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
रवींद्र चांदेकर यवतमाळ
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल घोषित झाले. या निकालावरून नजर टाकल्यास अद्यापही ग्रामीण भागात काँग्रसेचा वरचष्मा कायम असल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषदेच्या ६१ जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक २० जागा पटकावल्या. भाजपाने १८ आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी ११ जागा मिळविल्या. केवळ एका ठिकाणी अपक्षाला विजय मिळाला. तथापि ६१ पैकी सर्वाधिक २३ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. या गटांमधून दुसऱ्या पक्षाचे उमेदवार निवडून आले. काँग्रेसच्या उमेदवारांना आणखी थोडी ताकद मिळाली असती, तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. यापैकी काही उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाले. या २३ पैकी किमान १० ते १२ उमेदवार विजयी होणे सहज शक्य होते, असे निकालावरून दिसून येते.
जिल्हा परिषदेच्या ६१ पैकी १३ गटांमध्ये भाजपाचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ११ उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले. एका गटामध्ये काँग्रेसचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार दुसऱ्या स्थानी आहे. यावरून काँग्रेसच सर्वाधिक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट होते. त्यापैकी निम्मे उमेदवार जरी विजयी झाले असते, तर काँग्रेस जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असता, हे निश्चित. मात्र काँग्रेस नेते त्यात अपयशी ठरले. तसेच अनेक गटांमध्ये त्यांची उमेदवार निवडही चुकल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना नेत्यांनी सर्व लक्ष प्रामुख्याने दारव्हा, दिग्रस, नेर परिसरावरच केंद्रीत केल्याचे दिसते. वणी, मारेगाव, झरी परिसरावरही त्यांचे लक्ष होते. तथापि तेथे त्यांची ताकद कमी पडल्याचे स्पष्ट झाले. मात्र दारव्हा, दिग्रस, नेर तालुक्यात शिवसेनेने इतर सर्वांना भूईसपाट केले. या पक्षाचे दुसऱ्या क्रमांकावरील निम्मे उमेदवार विजयी झाले असते, तर शिवसेनेचा आकडा निश्चितच २५ च्या पुढे गेला असता. तीच स्थिती भाजपाची असून त्यांचे दुसऱ्या क्रमांकावरील निम्मे उमेदवार विजयी झाले असते, तर त्यांचाही आकडा २५ च्या जवळपास पोहोचला असता. एकूणच सर्वच पक्षांनी थोडी ताकद लावली असती तर बहुमतानजीक पोहोचले असते.