हप्ता देऊनही ऐकावी लागते पोलिसांची शिवीगाळ
By admin | Published: December 23, 2015 03:17 AM2015-12-23T03:17:59+5:302015-12-23T03:17:59+5:30
स्थळ बसस्थानक चौकातील चिंतामणी पॉईटं. वेळ दुपारी २ वाजताची. गणवेशात एक पोलीस अर्वाच्य शिवीगाळ करीत होता.
चिंतामणी पॉर्इंट लाईव्ह : गाव गुंडाप्रमाणे खासगी वाहतूकदारांकडे वसुलीसाठी तगादा
यवतमाळ : स्थळ बसस्थानक चौकातील चिंतामणी पॉईटं. वेळ दुपारी २ वाजताची. गणवेशात एक पोलीस अर्वाच्य शिवीगाळ करीत होता. तो नेमका कोणाचा उध्दार करीत आहे, हे समाजयालाही मार्ग नाही. तेथे बघ्यांची चांगली गर्दी झाली. शेवटी येथेच असलेल्या एकाचा संयम सुटला. हप्ता देऊनही शिव्या कोणी ऐकायच्या असे म्हणतो चक्का त्या शिपायाच्या अंगावर धावला. बघ्यातीलच काहींनी त्याची समजूत काढत बाजूला नेले अन् पुढील अनर्थ टळला.
कायद्याच्या लेखी अवैध असली तरी खासगी प्रवासी वाहतुकीची साधने ग्रामीण जनतेसाठी आवश्यक झाली आहे. त्यातूनच शोषणाची मोठी मालिका सुरू होते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाकडून हप्ता द्यावा लागतो, हे सर्वश्रृत आहे. याबाबत कोणाची तक्रारही नसते. मात्र पैसे घेऊनही पोलीस त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी खासगीत सुरू असतात. दारव्हा मार्गावर चालणाऱ्या एका मिनिडोर चालकाने ठरल्याप्रमाणे ४०० रुपये हप्ता ग्रामीण ठाण्यातील एका वाहतूक शिपायाला पोहोचता केला. ही रक्कम घेण्यासाठी शिपायाने चक्क भररस्त्यात वाहन अडविले होते. त्यावेळी शिपाई धुंद अवस्थेत असल्याने पैसे दिल्याचे लक्षात राहणार नाही, असे चालकाकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र काही एक न ऐकता पोलीस शिपाई निघून गेला. मिनिडोअर चालकाची शंका मंगळवारी दुपारी खरी ठरली. तोच पोलीस शिपाई आपली बुलेट घेऊन चिंतामणी पॉर्इंटवर धडकला. मिनीडोअर चालकाचे नाव घेऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. गर्दी वाढताच या शिपायाला आणखीच जोर चढला. त्याने थेट मिनिडोअर चालकाच्या कुटुंबियांनाही शिवीगाळ सुरू केली. हा प्रकार पाहून शांत असलेल्या त्या चालकाचा पारा भडकला. त्याने थेट शिपायाच्या अंगावर धाव घेतली. शिपयाने नेहमी प्रमाणे खोट्या गुन्ह्यात दडपण्याची धमकी दिली. तेव्हा इतर चालकांनी त्याची समजूत काढत तरुणाला बाजूला केले. शिपायाने सुध्दा तेथून काढता पाय घेतला.
पोलीस कर्मचारी पैसे घेऊनही सार्वजनिकरित्या शिवीगाळ करत असल्याचे मिनिडोअर चालकांनी सांगितले. दिवसभर मेहनत करून फार थोडी रक्कम घरी नेता येते. सर्वच ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना हप्ता द्यावाच लागतो. मंगळवारी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या शिपायाची वर्तणूक तर एखाद्या गाव गुंडालाही लाजवणारी होती, हे तेवढेच खरे. (कार्यालय प्रतिनिधी)