पुसदमध्ये सात दिवासानंतरही दत्त मंदिर अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:41 AM2021-03-19T04:41:34+5:302021-03-19T04:41:34+5:30

पुसद : शहरातील मोतीनगर स्थित दत्त मंदिराचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे १२ मार्चपासून मंदिर अंधारात बुडाले आहे. ...

Even after seven days in Pusad, the Datta temple is still in darkness | पुसदमध्ये सात दिवासानंतरही दत्त मंदिर अंधारातच

पुसदमध्ये सात दिवासानंतरही दत्त मंदिर अंधारातच

Next

पुसद : शहरातील मोतीनगर स्थित दत्त मंदिराचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे १२ मार्चपासून मंदिर अंधारात बुडाले आहे. संस्थान समितीच्या गलथान कारभारामुळे ही वेळ ओढवली आहे.

शहराच्या हृदयस्थानी असलेल्या मोतीनगरमधील अतिशय पुरातन आणि जागृत दत्त मंदिराची दुरवस्था झाली आहे. मंदिराचे दोन्ही प्रवेशद्वार अनेक दिवसांपासून बंद आहे. आता वीजही कापली गेल्याने कमिटीला मंदिरच बंद करायचे की काय, असा प्रश्न भक्त विचारत आहे. श्री दत्त मंदिर ट्रस्टचे आधीचे सर्व सदस्य बदलवून नवीन सदस्य घेऊन मोक्याच्या ठिकाणची जागा हस्तगत करण्याच्या उद्देशाने गठित कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे आहेत.

इतर सदस्यांपैकी केवळ एकाच कुटुंबातील तीन-चार सदस्यांना कार्यकारिणीत घेऊन एकाच कुटुंबाचा एकछत्री कारभार दिसून येत आहे. डिसेंबरमध्ये साध्या पद्धतीने पार पडलेल्या दत्त जन्म उत्सवातदेखील गलथान कारभार झाल्याची भक्तांची तक्रार आहे. महाप्रसाद नसल्याने यावर्षी कुणीही मंदिराला शिधा किंवा धान्य देऊ नये म्हणून समितीने मोठे फलक लावले होते. मात्र, अनेक भक्तांकडून अन्नदानाच्या गोंडस नावाखाली पावत्या फाडून आणि अन्नदान न करून एकप्रकारे भक्तांची फसवणूक केल्याचा आरोपही होत आहेत. दत्तमूर्तीला तीन-चार वर्षांपासून रंग दिलेला नाही. संस्थानचे सर्व व्यवहार केवळ 'त्या' कुटुंबाच्या एकाच व्यक्तीच्या हाती आहेत. ती व्यक्ती मात्र ‘तो मी नव्हेच‘ या अविर्भावात नामानिराळे राहते. पूर्वी मंदिराच्या नावाने असलेले वीज मीटर या महाशयांनी स्वतःच्या नावाने करून घेतल्याने शंकेची पाल चुकचुकते. आजपर्यंत एकही संस्थानसंदर्भातील बैठक मंदिरात न घेता त्यांच्या घरी उरकली जाते. दानपेटीतील सर्व पैशांचीही घरीच मोजदाद होते. कुणाला संस्थानची जागा भाड्याने द्यायची, काय भाडे घ्यायचे तसेच संस्थानबाबत काय निर्णय घ्यायचे, हे सर्व त्यांच्याकडूनच सुचविले जाते.

संस्थानच्या जमिनीवर एक मोटार गॅरेज भाड्याने दिलेले असून, इतर काही सामानही भाडेतत्त्वावर ठेवल्याचे समजते. एका खासगी शाळेच्या गाड्याही मंदिर परिसरात उभ्या असायच्या. याबाबत किती भाडे संस्थानला मिळाले किंवा कुणाला यातून किती वैयक्तिक लाभ झाला, या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. राजकीय पुढारीपण मिरवणारे काही नेते या कमिटीमध्ये सामील असून, त्या सर्वांच्या संगनमताने होणाऱ्या निर्णयामुळे संस्थानचे वाटोळे होत आहे. निस्सीम भक्तांच्या भावनांना नाहक ठेच पोहोचत आहे. कमिटीविरोधात प्रचंड संताप आणि रोष व्यक्त केला जात आहे. या जुन्या मंदिराच्या त्वरित जीर्णोद्धाराची गरज असून, पडझडीसंदर्भात एखादी अप्रिय घटना घडल्यास समिती जबाबदारी घेणार का, या आणि अशा अनेक समस्यांबाबत आवाज उठवून प्रसंगी या कमिटीची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्याची मागणी दत्तभक्तांमधून जोर धरत आहे.

Web Title: Even after seven days in Pusad, the Datta temple is still in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.