स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही त्यांच्या नशिबी नावेतूनच प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:34 AM2021-07-25T04:34:44+5:302021-07-25T04:34:44+5:30
शिंदोला : वणी तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी किनाऱ्यावरील तेजापूर आणि गांधीनगर नदी घाटावर पुलाअभावी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वाटसरूंना ...
शिंदोला : वणी तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी किनाऱ्यावरील तेजापूर आणि गांधीनगर नदी घाटावर पुलाअभावी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वाटसरूंना पिढ्यानपिढ्या नाहक त्रास सोसावा लागत आहे. या नदीघाटावर पूल निर्माण करण्याची मागणी आहे. मात्र, त्याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी स्वातंत्र्याच्या सत्तारीनंतरही दोन्ही जिल्ह्यातील ग्रामस्थांना धोक्यात घालून नावेवरून प्रवास करावा लागतो.
वणी तालुक्यातील शेवटच्या टोकाला दक्षिणेकडे पैनगंगेच्या किनाऱ्यावर वसलेलं तेजापूर आणि पैलतीरावर गांधीनगर (कोळसी) गावं. गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात आहे. तालुक्यापासून ४० किलोमीटर दूर अंतरावर असल्याने केवळ कोर्टकचेरी, मालमत्ता खरेदी-विक्री आदी कामासाठी वणीत ग्रामस्थांची येजा असते. तथापि, आरोग्य सुविधेसह अन्य गरजांच्या पूर्ततेसाठी लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात लोकांची पूर्वीपासून ये-जा आहे. मात्र, पैनगंगा नदी बारमाही वाहणारी असल्याने गरजूंना नावेवरून प्रवास करावा लागतो. यामुळे पुराच्या वेळी नाव उलटून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळ्यात चंद्रपूर गाठण्यासाठी ३५ किलोमीटर अंतराचा वळसा घेत प्रवास करावा लागतो. परिणामी आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शहरांचा विकास झपाट्याने होत आहेत. मात्र, खेडुतांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. हे दुर्दैवाची बाब आहे. म्हणून नागरिकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने पैनगंगा किंवा विदर्भा नदीवर कमीतकमी लहान पुलाची तरी निर्मिती करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. सदर पुलाची निर्मिती झाल्यास तेजापूर, आमलोन, चिलई, गांधीनगर, कोळशी, तांबाडी, कोरपना आदी दोन्ही जिल्ह्यातील ग्रामस्थांना दिलासा मिळू शकतो. तेजापूर गावाच्या पूर्वेकडून एक मोठा ओढा, विदर्भा नदी आणि दक्षिणेकडून पैनगंगा नदी वाहते. विदर्भा नदी बारमाही वाहणारी नसल्याने हिवाळ्यात, उन्हाळ्यात नदी पार करून देऊरवाडा मार्गे चंद्रपूरला येजा करता येते. मात्र, पावसाळ्यात हा मार्ग बंद होतो. म्हणून चंद्रपूर ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून नावेने प्रवास करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. महेंद्र लोढा यांनी गावालगतच्या ओढ्यावर तात्पुरती व्यवस्था म्हणून लहान पुलाचे बांधकाम केले होते. तथापि, मुसळधार पावसामुळे हा पूल वाहून गेल्याने पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली.
संदीप टोंगे, शेतकरी, तेजापूर