स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही पाण्यासाठी वणवण भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 10:42 AM2021-03-17T10:42:51+5:302021-03-17T10:43:35+5:30
Yawatmal News यवतमाळ तालुक्यात बोथबोडन हे गाव आहे. याच गावापासून एक किलोमीटर अंतरावर गोकूळ हेटी आहे. गोकूळ हेटी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांची पायपीट सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत. शहरी भागाचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही सोयी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. ना रस्ता, ना घरकूल, पाण्यासाठी वणवण भटकंती, अशा भयावह अवस्थेत स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही यवतमाळ जिल्ह्यातील गोकुळ हेटीवासीयांना जगावे लागत आहे.
यवतमाळ तालुक्यात बोथबोडन हे गाव आहे. २००८ साली याच गावाला राहुल गांधी यांनी भेट दिली होती . यानंतर हे गाव संपूर्ण भारतात चर्चेत आले होते . याच गावापासून एक किलोमीटर अंतरावर गोकूळ हेटी आहे. गोकूळ हेटी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांची पायपीट सुरू झाली आहे. पाईपलाइन टाकून आहे. विहिरीला पाणी आहे. पण केवळ पाईपलाईन चोकअप असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. महिलांच्या सोबत लहान मुलांना पाण्यासाठी जावे लागते. पाण्यासाठी पाच ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
येथे गवळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा दूधाचा व्यवसाय आहे . प्रत्येक व्यक्तिकडे 50 ते 100 जनावर आहे. दुभत्या जनावरांना कसे जगवावे असा प्रश्न त्यांना पडला आहे . गावातील बोअर कोरडे पडले आहेत आहे.1987 मध्ये या विहिरी वरुन बोथबोडन ,गोकूळ हेटी येथे या योजनेतुन पाणी पुरवठा होता. आता पाईपलाईन चोकअप झाल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
गावकऱ्यांनी सरपंच यांची भेट घेऊन व्यथा मांडली. मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप नागरीकांनी केला आहे. एकूणच विकासाचा गाजावाजा केला जात असला तरी गोकूळ हेटी येथील पाण्याची समस्या बघून सरकारचा दावा किती फोल आहे, हे दिसून येते.