'अमृत'साठी कोट्यवधी खर्चूनही यवतमाळकरांची पाण्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 02:19 PM2023-06-14T14:19:32+5:302023-06-14T14:20:34+5:30

डाॅ. विजय दर्डा यांनी घेतली दीपक कपूर यांची भेट : अपर मुख्य सचिव घालणार वैयक्तिक लक्ष

Even after spending crores on Amrit scheme Yavatmalkars are not getting water | 'अमृत'साठी कोट्यवधी खर्चूनही यवतमाळकरांची पाण्यासाठी वणवण

'अमृत'साठी कोट्यवधी खर्चूनही यवतमाळकरांची पाण्यासाठी वणवण

googlenewsNext

यवतमाळ : अडीच वर्षात पूर्ण करावयाची अमृत पाणीपुरवठा योजना सहा वर्षांनंतरही अपूर्णच आहे. त्यातच योजनेला भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याने अनेक ठिकाणी गळती लागून पाइपलाइनच्या ठिकऱ्या उडत असल्याने ऐन उन्हाळ्यात यवतमाळकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नागरिकांनी पाणीटंचाईची ही भीषण स्थिती मांडल्यानंतर माजी खासदार डाॅ. विजय दर्डा यांनी जलसंपदा प्रकल्प व विकास विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावर या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना कपूर यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या असून अमृत योजनेमध्ये स्वत: लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली आहे.

यवतमाळ शहराला पुरेसे आणि नियमित पाणी मिळावे यासाठी ३०२ कोटी रुपयांच्या अमृत योजनेची घोषणा करण्यात आली. २०१७ मध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात होऊन ३० महिन्यात योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र सुरुवातीपासून ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली. सध्या योजनेचे ९९ टक्के काम झाल्याचे सांगितले जात आहे. पाण्यासाठी १६ टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. तीन संतुलन टाक्यांचेही काम झाले असल्याचे जीवन प्राधिकरणातर्फे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शहरवासीयांना नियमित आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याची वस्तुस्थिती नागरिकांनी डाॅ. विजय दर्डा यांना बोलून दाखविली.

नागपूर रोड, भोसा रोड परिसरात कधीही पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळत नाही. या भागात अमृत योजनेच्या झोनिंगची कामे सुरू असल्याचे मागील दोन वर्षांपासून सांगितले जात असल्याची तक्रारही नागरिकांनी केली. तर धामणगाव मार्गावर असलेल्या गांधीनगर, राजेंद्रनगर तसेच उमरसरातील गुरु माऊली सोसायटी परिसरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील आबालवृद्धांसह नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच शहरात कुठल्याही भागात फेरफटका मारल्यास भर उन्हात नागरिक हातपंप किंवा इतर स्रोतावर पाण्यासाठी भटकताना दिसतात.

यवतमाळातील पाणीटंचाईची ही भीषण विदारकता ऐकल्यानंतर डाॅ. विजय दर्डा यांनी थेट जलसंपदा प्रकल्प व विकास विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांची भेट घेतली. प्रकल्पामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे शहरवासीयांना भीषण टंचाईचा सामना करावा लागत असल्याची बाब कपूर यांच्या निदर्शनास आणून दिली.

शहरातील पिण्याच्या पाण्याबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सिंचनाचा प्रश्नही त्यांनी मांडला. जिल्ह्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अपूर्ण व नादुरुस्त सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची गरजही डाॅ. दर्डा यांनी व्यक्त केली. यावर दीपक कपूर यांनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना यवतमाळच्या अमृत योजनेमध्ये तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. तसेच या योजनेसह जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार असल्याची ग्वाही दिली.

अमृत योजनेनंतर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही याही उन्हाळ्यात शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ही बाब व्यथित करणारी आहे. टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना होणे गरजेचे असून त्यासाठीच दीपक कपूर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. याबरोबरच जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्याचीही मागणी केली. या प्रश्नी राज्य शासनाकडेही पाठपुरावा करणार आहे.

- डाॅ. विजय दर्डा (माजी खासदार), चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड

अमृत योजनेचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. काही प्रमाणात झोनिंगचे काम बाकी आहे. योजनेवर आठ ते नऊ ठिकाणी सोलर पॅनल बसविण्यात आलेले आहे. यामुळे वीजबिलामध्ये ३० टक्के कपातही येणार आहे. मात्र लिकेजेसमुळे मध्यंतरी काही अडचणी आल्या. हे लिकेजेसही आता दूर झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तत्काळ कामकाजामध्ये सुधारण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरात लवकर योजनेचे काम पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा करीत आहे.

- अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ

अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे. लिकेजेसमुळे या ठिकाणी कामकाजांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे काही भागाला पाणीटंचाई सोसावी लागली. मात्र आता हे लिकेजेसही निघाले आहेत. अमृत योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून शहराला लवकरच सुरळीत पाणीपुरवठा हाेईल.

- प्रफुल्ल व्यवहारे, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण, यवतमाळ

Web Title: Even after spending crores on Amrit scheme Yavatmalkars are not getting water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.