१८ लाख खर्चूनही वसंतनगरचे नागरिक तहानलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:39 AM2021-05-17T04:39:13+5:302021-05-17T04:39:13+5:30
पोफाळी : मे हिटच्या तडाख्यात पोफाळीच्या वसंतनगर परिसरातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सुमारे १८ लाख ...
पोफाळी : मे हिटच्या तडाख्यात पोफाळीच्या वसंतनगर परिसरातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सुमारे १८ लाख रुपये खर्च करून पाण्याची व्यवस्था असताना, ग्रामपंचायतीने गृहकर भरल्याशिवाय पाणी मिळणार नसल्याचा फतवा काढल्यामुळे नागरिकांवर पाणी असूनही पाण्याविना तडफडण्याची वेळ ओढावली आहे.
२०१७-१८ मध्ये येथील साखर कारखाना बंद पडला आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पाण्याची गरज पाहून या परिसरात सहा ठिकाणी कूपनलिका घेण्यात आल्या. त्यातील तीनला पाणीच नाही. उर्वरित तीन एप्रिलपर्यंत चालतात, नंतर कोरड्या पडतात. या तिन्ही कूपनलिका एकाच भागात आहेत. त्यामुळे इतर भागात नागरिकांना फायदा होत नाही.
महाराष्ट्र ग्रामीण योजनेंतर्गत आठ लाख रुपये खर्च करून २०१९ मध्ये विहीर पूर्ण करण्यात आली. विहिरीवरून १४व्या वित्त आयोगातून १० लाख रुपये खर्च करून वसंतनगर येथे पाइपलाइन टाकण्यात आली. २०२० मध्ये काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. ग्रामपंचायत कोरोना काळात गृहकर भरल्याशिवाय पाणी देण्यास तयार नाही. ५० टक्के गृहकर व ५०० रुपये अनामत रक्कम भरल्याशिवाय नळ जोडणी होणार नाही. या परिस्थितीतही ४० जणांनी अनामत रक्कम जमा केली. २० जणांनी गृहकर भरला आहे.
बॉक्स
४० जणांचा पाणीपुरवठा झाला सुरळीत
कारखाना कॉलनीतील ४० जणांनी अनामत रक्कम जमा केली. त्यांना पाणीपुरवठा सुरू झाला. हा परिसर औद्योगिक क्षेत्रात येतो. त्यामुळे नागरिक गृहकर भरत नाही. त्यांचा कर आत्तापर्यंत कारखाना प्रशासन भरत होते. आता त्यांनी केवळ ५०० रुपये अनामत रक्कम जमा करून पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे.
कोट
वसंतनगर येथील नळ योजनेसाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीत ५० टक्के गृहकर व अनामत ५०० रुपये रक्कम भरून सहकार्य करावे.
रेखा संतोष क्षीरसागर, सरपंच, पोफाळी