कोरोनातही कास्तकारांची हिंमत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 06:06 PM2020-07-10T18:06:22+5:302020-07-10T18:07:54+5:30
केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदाच्या खरीप हंगामातील पीक लागवडीचा अहवाल जाहीर केला आहे. त्या आकडेवारीनुसार यंदा संपूर्ण देशातील लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना आणि लॉकडाऊनने देशातील उद्योगधंदे अडचणीत असताना आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कृषी क्षेत्रावरही झालेला असताना देशातील कास्तकारांनी तगडी हिंमत कायम ठेवली आहे. या हिमतीमुळेच यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड दुप्पट तर सोयाबीन लागवड पाच पटीने अधिक झाली आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदाच्या खरीप हंगामातील पीक लागवडीचा अहवाल जाहीर केला आहे. त्या आकडेवारीनुसार यंदा संपूर्ण देशातील लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. देशात खरिपाचे अपेक्षित लागवड क्षेत्र १०६३ लाख हेक्टरपैकी मागील वर्षी केवळ २३० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र अडचणीत भर पडलेली असतानाही शेतकऱ्यांनी ४३२ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी केली आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा दुपटीने वाढविला. गेल्या वर्षी ४५ लाख ८५ हजार हेक्टरपर्यंत मर्यादित असलेला हा पेरा यंदा ९१ लाख ६७ हजार हेक्टरपर्यंत वाढला आहे. तर सोयाबीनचा पेरा मागील वर्षी १६ लाख ४३ हजार हेक्टरपर्यंत मर्यादित असताना यंदा हे क्षेत्र एकदम ८१ लाख ८१ हजार हेक्टरवर पोहोचला आहे. तुरीची लागवडही यंदा २ लाख ७९ हजार हेक्टरवरून थेट आठ पटींनी वाढून १६ लाख ५६ हजार हेक्टरवर पोहोचली आहे. याचाच प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातही आला असून यंदा ४ लाख ५५ हजार ५९९ हेक्टरमध्ये कापूस, २ लाख ७५ हजार ६२९ हेक्टरमध्ये सोयाबीन आणि १ लाख १० हजार ९५९ हेक्टरमध्ये तूर असे लागवड क्षेत्र वाढले आहे.
कडधान्यात महाराष्ट्र अव्वल
देशात कापसाचा पेरा महाराष्ट्रात सर्वाधिक झाला आहे. त्यासह कडधान्याचा महाराष्ट्रात झालेला ११ लाख ९४ हजार हेक्टरवरील पेरा देशात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल मध्यप्रदेश ६ लाख ५५ हजार, तेलंगणा २ लाख १६ हजार, राजस्थान १ लाख ९७ हजार, कर्नाटक १ लाख ८९ हजार, झारखंड ८९ हजार, उत्तर प्रदेश ६८ हजार, गुजरात ५३ हजार, आंध्र प्रदेश २७ हजार, छत्तीसगड २१ हजार, बिहार १९ हजार आणि हरियाणात केवळ १२ हजार हेक्टरवर कडधान्याचा पेरा आहे. शिवाय, ज्वारी लागवडीतही महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असून महाराष्ट्रातील उस लागवडही (१ लाख १० हजार हेक्टर) देशात सर्वाधिक ठरली.