राजकीय टँकरची गर्दी तरीही वाघापूर तहानलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 10:02 PM2018-05-03T22:02:39+5:302018-05-03T22:02:39+5:30
वाघापुरात पाणीटंचाईची सर्वाधिक भयावह स्थिती आहे. नगर परिषद, शिवसेना, भाजपा अन् अपक्ष नगरसेवकाने येथे टँकर सुरू केले आहे. यानंतरही खऱ्या गरजवंतांपर्यंत पाणी पोहचले नाही. यामुळे नागरिक रात्री २ वाजतापर्यंत स्मशानभूमीतील हातपंपावर पाणी भरताना दिसतात.
रुपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाघापुरात पाणीटंचाईची सर्वाधिक भयावह स्थिती आहे. नगर परिषद, शिवसेना, भाजपा अन् अपक्ष नगरसेवकाने येथे टँकर सुरू केले आहे. यानंतरही खऱ्या गरजवंतांपर्यंत पाणी पोहचले नाही. यामुळे नागरिक रात्री २ वाजतापर्यंत स्मशानभूमीतील हातपंपावर पाणी भरताना दिसतात. त्यांच्या मनात प्रशासनाविषयी रोष आहे.
यवतमाळ शहरातील राजकीय उलथापालथीचे केंद्रस्थान म्हणून वाघापूरकडे पाहिले जाते. सर्वच पक्षातील ‘अॅक्टीव’ कार्यकर्ते या भागात आहे. यामुळे सर्वाधिक टँकर या भागाकडे वळते झाले. तरी पाण्याची मागणी आणि उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. सोबतच नियोजनचा अभाव आहे. यामुळे झोपडपट्टी वसाहतीत पाणीच पोहचले नाही. यातून दररोज पाण्यासाठी संघर्षाची ठिणगी पडते.
वाघापुरातील स्मशानभूमीचा परिसर पाण्याच्या मुबलकतेने परिपूर्ण आहे. या ठिकाणच्या तीन हापशांना मुबलक पाणी आहे. स्मशानाच्या आत दोन तर प्रवेशद्वारावर एक हातपंप आहे. आतील दोन हातपंपांना मुबलक पाणी आहे. यातील एका हातपंपावरील ‘मटघर’ रात्रीतून चोरीला गेले. तेव्हापासून या भागात पाण्याची मोठी मारामार सुरू झाली. एकाही लोकप्रतिनिधीने त्या हातपंपावर ‘मटघर’ बसविले नाही. याचे शल्य या भागातील नागरिकांना आहे. यामुळे पवन कोळकर, राजू गाढवकर, योगेश राठोड यांनी ही हापशी तत्काळ दुरूस्त करावी, अशी कळकळीची विनंती केली. हापशी दुरूस्त झाली तर मग टँकर येवो अथवा न येवो आम्हाला कुठलीही खंत वाटणार नाही, असे ते म्हणाले. पण कोणीही हापशी दुरुस्त केली नाही. दिवसभर काम करावे का पाणी भरावे, हाच आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे. पाण्याशिवाय घर चालत नाही. यामुळे काम आटपून आल्यानंतर पाण्यासाठी पायपीट करावी लागते, असे मारूती उईके म्हणाले.
अनिल पुरी शिवाजीनगरात वास्तव्याला आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला फेबु्रवारीपासून पाण्यासाठी चटके सहन करावे लागत आहे. नगरपरिषदेचे टँकर त्यांच्या भागाकडे फिरकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आजपर्यंत पाण्यासाठी असे कधीच हाल झाले नाही. खºया अर्थाने रात्रन्दिवस काम करावे लागत आहे. यामुळे नगरातील प्रत्येक नागरिक वैतागला आहे, असे शरद वाघ म्हणाले. १४ एप्रिलला नळ आले. त्यात दोन गुंड पाणी मिळाले. यानंतर पाण्याचा एक थेंबही आला नाही. या भागातून टँकर जाताना दिसतात, मात्र पाणी येत नाही, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
या भागातील गृहिणींनी पाण्यासाठी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली. पिण्यासाठी पाण्याचे बॅरल आणू शकत नाही. यामुळे प्राधिकरणाच्या ‘लिक वॉल्व्ह’वरून पाणी भरले जाते. त्यासाठी तासन्तास स्मशानात रात्र जागून काढावी लागते. नगरपरिषद, भाजपा, शिसेना आणि अपक्षाचे टँकर आहेत. इतके टँकर असतानाही गरिबांच्या झोपडीपर्यंत टँकर पोहचतच नाही. टँकरचा वेळ आणि कामाला जाणाºया मजुरांचा वेळ वेगवेगळा आहे. मजूर सकाळीच कामाला जातात. टँकर दुपारी येतो. जे लोक घरी असतात ते पाणी भरतात. मजुरांना पाणीच मिळत नाही, असे ममता भगत आणि मनिषा भगत म्हणाल्या. पाणी वाटपासाठी असणाºया टँकरचे नियोजन नाही. एकाच वेळी सगळे टँकर एकाच लाईनला जातात. नंतर आठ दहा दिवस दिसत नाही. यासाठी सर्वांनी मिळून वेळापत्रक तयार करावे, अशी मागणी महिलांनी केली.
सकाळी वाटप का नाही?
ज्या नागरिकांना पाण्याची गरज आहे, असे लोक घरी नसताना टँकर येतो. हे टँकर कधी येतात याची माहिती नागरिकांना नसते. त्याचे ठराविक वेळापत्रक नाही. यासाठी सकाळी अथवा सायंकाळी पाणी वितरित का केले जात नाही, असा प्रश्न वाघापुरातील नागरिकांनी उपस्थित केला.