लॉकडाऊनमध्येही वणीत गांजाचे झुरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 05:00 AM2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:35+5:30
एकीकडे लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने पोलीस यंत्रणा बंदोबस्तात गुंतून आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक होत आहे, तर दुसरीकडे व्यसनांध तरूणाई पोलीस यंत्रणेच्या डोळ्यात धूळ झोकून गांजा ओढण्यासाठी निर्जनस्थळावर गर्दी करित आहे. या व्यसनांधांना गांजा नेमका कोठून पुरविला जातो, याचा शोध घेणेही तितकेच पोलिसांसाठी महत्वाचे ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : एरव्ही निर्जनस्थळावर गांजा ओढणाऱ्यांची नेहमीच गर्दी पहायला मिळते. लॉकडाऊननंतर ही गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच गर्दी कमी होण्याऐवजी ती वाढल्याचे भयावह चित्र वणी शहरात पहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून शासन आदेशानुसार दारूदुकाने बंद आहे. त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेले लोक पर्याय म्हणून गांजा ओढत असल्याची चिंताजनक बाब पुढे आली आहे. या व्यसनांध तरूणाईचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान वणी पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे गांजा शौकीनांमध्ये १० ते २५ वर्ष वयोगटातील मुलांची संख्या अधिक आहे.
एकीकडे लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने पोलीस यंत्रणा बंदोबस्तात गुंतून आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक होत आहे, तर दुसरीकडे व्यसनांध तरूणाई पोलीस यंत्रणेच्या डोळ्यात धूळ झोकून गांजा ओढण्यासाठी निर्जनस्थळावर गर्दी करित आहे. या व्यसनांधांना गांजा नेमका कोठून पुरविला जातो, याचा शोध घेणेही तितकेच पोलिसांसाठी महत्वाचे ठरले आहे. दुपारी ३ वाजतानंतर वणी शहर पूर्णत: लॉकडाऊन होते. रस्त्यावर शुकशुकाट असतो. सायंकाळच्यावेळी गांजा शौकीन मात्र निर्जनस्थळी एकत्र येऊन गांजाचे झुरके ओढतात. निर्गुडा नदीच्या काठावरील झुडूपात लपून तरूणाई आपले व्यसन पूर्ण करताना दिसत आहे.
सकाळच्यावेळीही याठिकाणी १० ते २० जणांचे टोळके एकत्रित बसून गांजा ओढताना अनेकांनी पाहिले आहे. दुसरीकडे वणी शहरात खºर्याचे शौकीनही मोठ्या संख्येने आहे. परंतु लॉकडाऊननंतर खर्रा शौकीनांची चांगलेच हाल सुरू झाले. सुगंधीत तंबाखूच्या पुरवठाधारकांनी माल मिळत नसल्याचा कांगावा करत तंबाखू चारपट दराने विकणे सुरू केले आहे. सुपारीचे भावदेखील तिप्पट झाले आहे. अशाही परिस्थितीत खºर्याच्या आहारी गेलेले शौकीन ४० रूपये देऊन खर्रा खरेदी करित आहे. संचारबंदीच्या काळात पानटपऱ्यांवरही बंदी घालण्यात आली. मात्र शहरातील काही पानटपरीधारक घरीच खर्रा तयार करून संबंधित शौकीनांना त्यांच्या घरापर्यंत खर्रा पोहोचवून देत आहेत. अशांचा शोध घेणेही पोलिसांपुढे जिकरीचे ठरत आहे.
गांधी चौकातून होतोयं तंबाखूचा पुरवठा
सुगंधीत तंबाखू व सुपारीच्या पुरवठ्याचे केंद्र गांधी चौक ठरले आहे. लॉकडाऊनमुळे हे केंद्र बंद असले तरी तंबाखू वितरकांचे एजंट छुप्या मार्गाने तंबाखू व सुपारी संबंधित खर्रा विक्रेत्यांपर्यंत पोहोचवित आहेत.