शाळा भरल्या, तरी मुलांचे मोबाईलवेड संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 05:00 AM2021-12-11T05:00:00+5:302021-12-11T05:00:07+5:30
मोबाइल जसा वाईट आहे तसाच तो कामाचाही आहे. अनेक मुले बाहेरगावच्या शाळेत जातात. त्यामुळे संपर्कासाठी त्याच्याकडे मोबाइल ठेवणे आवश्यक आहे. मुलांनी वर्गात मोबाईल बघू नये. उलट मोबाइलद्वारे अभ्यास करण्याच्या विविध सुविधांचा वापर केला पाहिजे.
अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वर्ष-दीड वर्ष ऑनलाइन क्लासेस केल्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाइलची सवय पक्की जडली आहे. आता शाळा ऑफलाइन सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांच्या मनातून मोबाइलप्रेम जायला तयार नाही. सध्या शाळेत जाताना अनेक विद्यार्थी आपल्या सोबत मोबाइल घेऊन जात आहेत. त्यामुळे पालकांसह खुद्द शिक्षक आणि मुख्याध्यापकही त्रस्त झाले आहे. वर्गात बसलेले असतानाच अनेक विद्यार्थ्यांचा मोबाइल खणखणतो. त्यामुळे संपूर्ण वर्ग डिस्टर्ब होण्याचे प्रकार घडत आहे. दिवसभर मोबाइल पाहण्यामुळे मुलांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचे शिक्षक व पालकांनी सांगितले.
...म्हणून मुलांना लागतो मोबाईल
- अनेक मुले गेल्या वर्षभरात मोबाइलचे ‘ॲडिक्ट’ झाले आहे. लाॅकडाऊनच्या काळात आठ-आठ तास ते मोबाइल खेळत होते. त्यामुळे आता शाळेत जातानाही मोबाइल सोडवत नाही.
- सध्या शाळा ऑफलाईन सुरू झाल्या असल्यातरी विविध विषयांचा स्वाध्याय मोबाईल दिला जात आहे. त्यामुळेही मुले अजूनही मोबाईल शाळेच्या नावाखाली बेसुमार वापरत आहे.
मुलांची काळजी, म्हणून दिला मोबाइल
मोबाइल जसा वाईट आहे तसाच तो कामाचाही आहे. अनेक मुले बाहेरगावच्या शाळेत जातात. त्यामुळे संपर्कासाठी त्याच्याकडे मोबाइल ठेवणे आवश्यक आहे. मुलांनी वर्गात मोबाईल बघू नये. उलट मोबाइलद्वारे अभ्यास करण्याच्या विविध सुविधांचा वापर केला पाहिजे.
- नंदराज गुर्जर, दिग्रस
गोरगरिबांची मुले शाळेत मोबाइल आणत नाहीत. शाळेत काय त्यांना घरीही मोबाइल मिळत नाही. मात्र, काही श्रीमंतांची मुले मोबाइलचा अतिवापर करीत आहेत. मुलगा शाळेत गेल्यावरही त्याच्या संपर्कात राहता यावे या काळजीपोटी पालक मुलांच्या दप्तरात मोबाइल देत आहेत.
- संजय चुनारकर, यवतमाळ
शाळेत मोबाईल नकोच
अनेक मुले तासिका सुरू असतानाही मोबाईल वापरतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती घटल्याचेही जाणवत आहे. अनेकांच्या डोळ्यावर विपरित परिणाम होत आहे. मुले अभ्यासात परावलंबी बनत आहेत.
- साक्षी बनारसे, मुख्याध्यापिका, नारायण माकडे विद्यालय
ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलचा अधिक वापर केल्याने आता विद्यार्थ्यांना ऑनलाईनचीच सवय झाली आहे. आमच्या शाळेत कुणी मोबाईल आणत नाही. ऑफलाईन अध्यापनात विद्यार्थिनी मनापासून सहभागी होतात.
- सुलभा कटके, मुख्याध्यापिका, रमाबाई आंबेडकर कन्या शाळा