पक्षीवैभव संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:36 PM2019-04-22T21:36:02+5:302019-04-22T21:36:33+5:30
तापमानाचा पारा वाढत असूनही जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात विविध रंगी पक्षांची घरटी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मात्र जलस्रोत आटत असल्याने ही घरटी आणि त्यातील अंडी उघडी पडली असून पक्षीवैभव संकटात सापडण्याचा धोका आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तापमानाचा पारा वाढत असूनही जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात विविध रंगी पक्षांची घरटी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मात्र जलस्रोत आटत असल्याने ही घरटी आणि त्यातील अंडी उघडी पडली असून पक्षीवैभव संकटात सापडण्याचा धोका आहे.
पांढरकवडाजवळील सायखेडा धरण, तेथून जवळच असलेल्या वाई, करणवाडी, जांब येथील तलावांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात पक्षांची घरटी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये चिमणासुरय (लिटील टर्न), पानभिंगरी, नदीसुरय, शेकाट्या या पक्षांच्या घरट्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मानद वन्यजीव रक्षक डॉ.रमजान विराणी यांच्या निरीक्षणादरम्यान या घरट्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. अशाच प्रकारच्या नोंदी यवतमाळजवळील निळोणा, बेंबळा धरणावरसुद्धा घेण्यात आल्या आहेत. बहुतांश घरटी धरणातील पाणी कमी झाल्यानंतर उघडी पडलेली आहेत. तलाव क्षेत्रातील जमिनीवर, गवतात किंवा वाळूच्या ठिकाणी यातील बहुतांश घरटी दिसतात. अशा पानथळ जागेवरील पक्षांची घरटी टिकविण्यासाठी व त्या क्षेत्रातील अन्न साखळी अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे. या भागात जनावरे चारताना, तलावावरुन ओलित करताना किंवा मासेमारी करताना या घरट्यांना व त्यातील अंड्यांना इजा होण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे सायखेडा धरणात हे चित्र मोठ्या प्रमाणात असून तेथे काळजी घेण्याचे आवाहन डॉ. रमजान विराणी यांनी केले आहे.
धरणातील मगरीचे आज ड्रोनद्वारे निरीक्षण
पांढरकवडाजवळील सायखेडा धरणात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या जहाजाच्या आकाराची मगर आढळत आहे. मानद वन्यजीव रक्षक डॉ. विराणी यांनी माहिती पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसंरक्षक के.एम. अभर्णा यांना दिली. त्याची दखल घेत आता मंगळवारी ड्रोन कॅमेराद्वारे निरीक्षण करून या धरणात मगर असल्याची खात्री केली जाणार आहे. त्यानंतर पुढील पावले उचलली जाणार आहे.