अखेर नागरिकांनीच पकडले घरफोड्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 05:00 AM2022-02-21T05:00:00+5:302022-02-21T05:00:17+5:30

सकाळपासूनच बंद घरावर नजर ठेवून असणारे चोरटे घिरट्या घालत होते. त्यापैकी एकजण परिसरात भंगार खरेदीचा व्यवसाय करण्यासाठी नेहमी फिरत होता. नागरिकांचा यावरून संशय बळावला. पोलीस काहीच मदत करणार नाही हे माहीत असल्याने या चोरट्यांना रंगेहात पकडण्याचा प्लॅन नागरिकांनीच तयार केला. घरावर नजर ठेवून असलेले चोरटे बंद घराच्या आत शिरले. दार तोडून घरात जाणार त्यापूर्वीच नागरिकांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यातील एकजण हाती लागला. 

Eventually the burglary was caught by the citizens | अखेर नागरिकांनीच पकडले घरफोड्याला

अखेर नागरिकांनीच पकडले घरफोड्याला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात सातत्याने चोरी व घरफोड्या होत आहेत. स्थानिक पाेलीस ठाण्यांमध्ये कुठलीच कारवाई आजपर्यंत करण्यात आली नाही. चोरीच्या घटना होत असतानाही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासण्यात आले नाही. यामुळे चोऱ्या वाढत आहे. शनिवारी रात्री वडगाव परिसरातील श्रीराजनगरमध्ये एका बंद घरावर दिवसभरापासून दोन संशयित पाळत ठेवून होते. ही बाब परिसरातील जागरूक नागरिकांच्या लक्षात आली. ९.३० वाजता चोरटे बंद घराच्या कंपाऊंडमध्ये शिरले. नागरिकांनी शिताफीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. एक आरोपी नागरिकांच्या हाती लागला, तर एकजण पळून गेला. 
श्रीराजनगरमधील एक कुटुंब दोन दिवसांपासून बाहेरगावी गेले आहे. त्या घरावर अनोळखी युवक पाळत ठेवून होते. ही बाब शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली. सकाळपासूनच बंद घरावर नजर ठेवून असणारे चोरटे घिरट्या घालत होते. त्यापैकी एकजण परिसरात भंगार खरेदीचा व्यवसाय करण्यासाठी नेहमी फिरत होता. नागरिकांचा यावरून संशय बळावला. पोलीस काहीच मदत करणार नाही हे माहीत असल्याने या चोरट्यांना रंगेहात पकडण्याचा प्लॅन नागरिकांनीच तयार केला. घरावर नजर ठेवून असलेले चोरटे बंद घराच्या आत शिरले. दार तोडून घरात जाणार त्यापूर्वीच नागरिकांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यातील एकजण हाती लागला. 
वैभव जिरकर, रा. तलावफैल असे नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने स्वत:चे नाव सांगितले. त्याला आणखी दरडावून विचारल्यावर साथीदार रोशन क्षीरसागर ऊर्फ चिकण्या, रा. बांगरनगर हा सोबत असल्याचेही सांगितले. शहरातील अनेक घरफोड्यांची कबुली त्याने नागरिकांपुढे दिली. नंतर अवधूतवाडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. अवधूतवाडीतील कर्मचारी नितीन सलाम यांनी घटनास्थळ गाठून आरोपी वैभव जिरकर याला ताब्यात घेतले. या चोरट्याकडून अनेक घटना उघड होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी पोलीस किती परिश्रम घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे वरातीमागून घोडे 
- शहरात चोरट्यांची दहशत पसरली असताना आता स्थानिक गुन्हे शाखेला जाग आली आहे. रेकॉर्डवरच्या आरोपींची तपासणी व धरपकड केली जात आहे. शनिवारी राबविलेल्या मोहिमेतून १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. चोरीच्या घटनांचा महत्त्वपूर्ण सुगावा हाती लागतो का, याचा शोध घेतला जात आहे. 
- मात्र नागरिकांनी चोरट्याला पकडल्यानंतर पोलीस पोहोचले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.  

 सराईत गुन्हेगार बाहेर कसे ?
- श्रीराजनगरमध्ये नागरिकांनी पकडलेला चोरटा वैभव जिरकर व त्याचा साथीदार रोशन क्षीरसागर ऊर्फ चिकण्या यांच्या विरोधात पाेलीस दप्तरी अनेक गुन्हे आहेत. सातत्याने घरफोड्या होत असतानाही अवधूतवाडी पोलिसांनी या रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला एकदाही चौकशीसाठी बोलाविण्याची तसदी घेतली नाही. सराईत चोर गावात फिरत असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेऊन गप्प का होते, असा संशय व्यक्त होत आहे. खात्यातीलच काहींची चोरीच्या रॅकेटमध्ये भागीदारी तर नाही ना, असाही संशय उपस्थित केला जात आहे.  

अशी आहे चोरीची पद्धत 
- चोरटे शहरातील विविध भागात भंगार व इतर व्यवसायाच्या निमित्ताने फिरतात. घरांची रेकी केली जाते. दिवसभर पाळत ठेवून रात्री घरफोडीचा बेत आखला जातो. त्यानंतर कोठून घरात शिरायचे व मुद्देमाल कसा पळवायचा याचे नियोजन केले जाते. पोलिसांच्या प्रमुख मार्गाने फिरणाऱ्या गस्तीच्या वाहनांना पद्धतशीरपणे चकमा देण्यात येतो. या पद्धतीमुळेच पोलिसांना चोर सापडत नाही.

 

Web Title: Eventually the burglary was caught by the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर