कधी शाळेच्या बाहेर, कधी कॉलेजच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 09:14 PM2018-01-09T21:14:24+5:302018-01-09T21:15:06+5:30
शिकायचे आहे म्हणून त्याला रोज शाळेकडे जावेच लागते. शिकायला नव्हे विकायला! बुढ्ढी के बाल.. पाण्याचे बुडबुडे उडवणारे खेळणे..
अविनाश साबापुरे।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : शिकायचे आहे म्हणून त्याला रोज शाळेकडे जावेच लागते. शिकायला नव्हे विकायला! बुढ्ढी के बाल.. पाण्याचे बुडबुडे उडवणारे खेळणे.. फुगे अन् बरेच काही सायकलला अडकवून तो शाळांच्या पुढे फिरतो. कारण रोज सकाळी त्याला कॉलेजमध्ये जायचे आहे. विकायला नव्हे शिकायलाच!
बुढ्ढी के बाल... अनेकांच्या बालपणाला घट्ट चिटकलेली ही एक आठवण. काही वर्षांपूर्वी बाबांनी आणून दिलेला हाच खाऊ विकून जगण्याची वेळ अक्षयवर का आली..? कारण परिस्थिती त्याला ‘वर्गाबाहेर’च ठेवणारी आहे.
अकोलाबाजारजवळच्या हादगावमधून अक्षय खंदारेची स्टोरी सुरू होते. त्याचे बाबा बजरंग बांगड्या विकायचे. आई मंदा मजुरी करायची. अक्षय आणि रुपेश हे दोन लहानगे पायी चालत जाऊन अकोलाबाजारच्या शाळेत शिकायचे. गरिबी होती पण समाधान होते. अक्षय दहावीत ‘फर्स्ट क्लास’मध्ये आला. अकरावीसाठी यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयात आला. अन् नशिब रूसले. टीबीच्या आजाराने बाबांना घेरले. काळजीने आई अंथरूणाला खिळली. शिकून मोठ्ठे होण्याचे स्वप्न पाहणाºया अक्षयला अचानकच ‘मोठे’ व्हावे लागले...
घर चालविण्यासाठी यवतमाळच्याच एका दुकानात अक्षय नोकर बनला. सकाळी कॉलेज, दिवसभर नोकरी. अभ्यासाला वेळच नाही. शेवटी एका शेजाऱ्याला दया आली. त्याने पाचशे रुपये दिले अन् बुढ्ढी के बाल विकण्याचा सल्ला दिला. नोकरीपेक्षा धंदा बरा म्हणून अक्षय नव्या रोजगाराला लागला. कॉलेजमधून आला की यवतमाळातील विविध नामांकित शाळांपुढे तो विक्री करतो. गावाकडच्या आजारी आईबाबांनाही त्याने यवतमाळातच आणले. आठवडीबाजार परिसरात भाड्याच्या खोलीत आईबाबा आणि लहान भावाला त्याने छत्र दिले. सकाळी बीएच्या वर्गात बसणारा अक्षय दुपारी विविध शाळांच्या गेटबाहेर उभा असतो. चिमुकल्यांना एकेका फुग्यात हवा भरून देताना तो अनेकदा पैसेही घेत नाही. गोड बुढ्ढी के बाल विकताना तो आपल्या मनातले दु:ख कधी झळकूही देत नाही. दोनशे रुपये रोज कमावताना उपचार, उदरनिर्वाह आणि शिक्षण अशा तीन आघाड्यांवर तो संघर्ष करतोय.
स्पर्धा परीक्षेचा ‘अभिमन्यू’
शाळेपुढे खाऊ विकणारा अक्षय स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मोठ्या पदाची आस नाही पण आयुष्यात ‘सेटल’ होण्याचा अक्षयचा प्रयत्न आहे. स्पर्धा परीक्षेसाठी क्लासेस लावण्याची ऐपत नाही. त्याचा संघर्ष हाच त्याचा गुरू. म्हणून स्वत:च जमेल तसे आणि मिळेल ते पुस्तक तो वाचून काढतोय. मात्र अभ्यासासाठी निवांत वेळ त्याच्याकडे नाही. फिरस्तीच्या धंद्यापेक्षा एखादे दुकान मिळावे, एवढीच त्याची अपेक्षा आहे.