भूलथापांना बळी पडत प्रत्येक महिन्याला पाच मुली बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 06:02 PM2024-09-25T18:02:33+5:302024-09-25T18:03:49+5:30
अल्पवयीन मुलींचा टोकाचा निर्णय : भाकरीचा चंद्र शोधण्यात संवाद हरपला
जब्बार चीनी
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वाढती महागाई, कुटुंबीयांच्या अपेक्षा, मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालकांची मरमर सुरू आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यात व्यस्त झालेल्या पालकांना कुटुंबातील मुला- मुलींशी संवाद साधण्यास उसंतच नसल्याने एका मर्यादेपर्यंत कुंथून आयुष्य जगणारी मुले आता डिजिटल संवादाच्या नादी लागली आहेत. हवे ते पालकांकडून देण्याच्या प्रयत्नात अत्यावश्यक मोबाईल, सोशल मीडियाच्या माध्यमातून आभासी सुखाच्या कल्पनेत अल्पवयीन मुली टोकाचा निर्णय घेत घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढत आहे.
एकत्र कुटुंब पद्धत केव्हाच कालबाह्य झाली आहे. पूर्वीचे चार ते पाच भाऊ-बहिणीचे कुटुंब आता एकुलत्या एक आपत्यावर येऊन ठेपले आहे. किमान दोनच अपत्य जन्माला घालून त्यांचे संगोपन आणि शिक्षण करण्यात आई-वडिलांचे आयुष्य खपून जातेय. अत्याधुनिक जीवनशैलीचा अवलंब वाढल्याने खर्चातही वाढ झाली आहे. परिणामी, आई आणि वडील, अशा दोघांनाही पैसा कमावण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. कुटुंबातील लहानगे आणि वयोवृद्ध यांच्याशी होणारा संवाद पूर्णतः हरपून गेल्याने त्याचे दुष्परिणाम आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. आपल्या मुलांना हवे ते देण्याची क्षमता असणाऱ्या पालकांना पाल्यांशी संवाद साधण्यास वेळ नाही, त्यांचे ऐकून घेणाऱ्या कुटुंबात कोणी नाही. अशा अवस्थेत अल्पवयीन मुले-मुली आभासी जगाकडे खेचले जात असून त्यांच्या हातातील मोबाईल त्यांचा सच्चा साथी झाला आहे. जगाला मुठीत आणलेल्या मोबाईल आणि सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुले आभासी संवाद (चॅटिंग) साधू लागली आहेत. याच चॅटिंगच्या माध्यमातून नवे मित्र, मैत्रिणी तयार होऊन कमी वयातच नको ते करण्याचे धाडस ही मंडळी करू लागली आहेत.
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मैत्री व ओळखी होऊन नंतर त्याचे प्रेमात रूपांतर आणि वयाची १८ वर्षे होण्यापूर्वीच पलायन केलेल्या मुलींचे प्रमाण यात सर्वाधिक असून, गेल्या आठ महिन्यांत वणी तालुक्यात जवळपास ३८ मुलींनी पलायन केले आहे. त्यापैकी बहुतांश मुली १७ वर्षे पाच महिने, आठ महिने, १० महिने, अशाच वयाची आहेत. पळून गेल्यानंतर वय पूर्ण होईस्तोवर बेपत्ता राहून नंतर लग्न करून या मुली समोर आल्या. नंतर पालकांचाही नाइलाज होतो.
आठ महिन्यांत ३८ मुली बेपत्ता
वणी तालुक्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत ३८ मुली, तर पाच मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी २३ मुली व दोन मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.