प्रत्येकाने घ्यावा कलाम यांचा आदर्श
By admin | Published: October 17, 2015 12:41 AM2015-10-17T00:41:55+5:302015-10-17T00:41:55+5:30
ए.पी.जे.अब्दुल कलाम अतिशय सामान्य कुटुंबातील असतानासुद्धा राष्ट्रपती पदापर्यंत ते पोहचू शकले. देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रात तब्बल ३० वर्षे त्यांनी सर्वोच्च पदावर काम केले.
सचिंद्रप्रताप सिंह : बचत भवन येथे वाचन प्रेरणा दिन साजरा
यवतमाळ : ए.पी.जे.अब्दुल कलाम अतिशय सामान्य कुटुंबातील असतानासुद्धा राष्ट्रपती पदापर्यंत ते पोहचू शकले. देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रात तब्बल ३० वर्षे त्यांनी सर्वोच्च पदावर काम केले. साधी राहणीमान आणि चांगले विचार तसेच परिश्रमामुळेच ते यशस्वी होऊ शकले. त्यांचा हा आदर्श प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
बचत भवन येथे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपलजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, संतोष पाटील, संदीप महाजन, फडके, विजय भाकरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अब्दुल कलाम लहानशा कुटुंबातील असतानाही त्यांनी राष्ट्रपती पदापर्यंत उत्कृष्ठ कार्य करून समाजास चांगला संदेश दिला आहे. ते वैज्ञानिक असतानासुद्धा त्यांनी सामाजिक कामात प्रोत्साहन दिले. समाजकार्य करणाऱ्यांना ते प्रोत्साहन देत, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. त्यांनी आपल्या पूर्ण जीवनात युवकांना प्रोत्साहित केले. स्वप्न बघा आणि पूर्ण करा. त्यासाठी परिश्रम करा असा संदेश ते नेहमीच युवकांना देत. अब्दुल कलाम यांनी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले. युवकांनी त्यांचा आदर्श घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सुरूवातीस जिल्हाधिकाऱ्यांनी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. यावेळी उपस्थित अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. सूत्रसंचालन बिजवे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)