त्रेता युगाच्या महानायकाचा सर्वत्र जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:00 AM2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:00:55+5:30
चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआऊट आणि भगवे झेंडे लावले होते. त्या ठिकाणी अनेक जण थांबून कटआऊटपुढे नतमस्तक होत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : श्रीराम जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या अयोध्येतील जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात मिटल्यानंतर उभारल्या जात असलेल्या भव्यदिव्य राम मंदिराच्या पायाभरणीचा क्षण बुधवारी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आणि विविध कार्यक्रमांनी साजरा केला.
ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये सकाळपासून भजनासह रामनामाचा गजर सुरू होता. काही मंदिरांमध्ये फुलांची सजावट केली होती. गडचिरोली शहरासह आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, अहेरी, सिरोंचा, कुरखेडा आदी ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
गडचिरोली शहरातील गुजरीजवळच्या श्रीराम मंदिरात सायंकाळी दिव्यांची आरास करून महिलांनी भजन सादर केले. चामोर्शी शहरातही आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण तयार झाले होते. देसाईगंजमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, तालुका अध्यक्ष राजू जेठानी, नरेश विठ्ठलानी, श्याम उईके, अनिल गुरफुले, अजय राऊत, प्रमोद शर्मा आदींनी फव्वारा चौकात नागरिकांना मिठाईचे वाटप केले.
अहेरी येथे एकही राम मंदिर नाही. त्यामुळे अनेक दिवसांच्या रामभक्तांच्या इच्छेनुसार बुधवारी जागेची निवड करून नियोजित जागेवर मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्ट व श्रीराम सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआऊट आणि भगवे झेंडे लावले होते. त्या ठिकाणी अनेक जण थांबून कटआऊटपुढे नतमस्तक होत होते.
दक्षिण गडचिरोलीत भागातील अहेरी, सिरोंचा येथेही जल्लोष करण्यात आला. सिरोंचा येथील बस स्थानक चौकात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेसमोर श्री रामनामाचा जयघोष करीत आतिषबाजी करण्यात आली. यावेळी भाजपसह श्रीराम सेना, रा.स्व.संघ, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अहेरी येथील शिवाजीनगरात श्रीराम मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला.
अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर हे तमाम भारतीयांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा भाग आहे. ज्या गोष्टीला हजारो वर्षांचे पौराणिक दाखले आहेत त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागला. उशिरा का होईना अखेर भारतीयांना त्यांचा राम मिळाल्याचा आनंद सर्वांना होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच आज अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिराच्या पायाभरणीच्या मुहूर्तावर संपूर्ण भारतवासियांनी दिवाळीसारखा आनंद साजरा केला. गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या सर्व बुथस्तरीय कार्यकर्त्यांपासून सर्व पदाधिकाऱ्यांनी आजचा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला. सायंकाळी कार्यकर्त्यांनी घरोघरी दीप प्रज्वलन केले. त्यामुळे जणूकाही दिवाळीच साजरी होत असल्याचे जाणवत होते. देसाईगंजमध्ये दुपारी पावसाचा जोर कमी होताच मिठाई वाटप करण्यात आले. यात अनेक मुस्लिम बांधवांनीही आनंदाने तोंड गोड केले हे विशेष.
- किशन नागदेवे, जिल्हाध्यक्ष, भाजप
श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा हा सोहळा सर्वांना सोबत पाहता आणि अनुभवता यावा म्हणून आमदार डॉ.देवराव होळी यांच्या संकल्पनेतून चामोर्शीत मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था केली होती. सायंकाळी चौकात ५ हजार लाडू आणि १० किलो पेढ्यांचा महाप्रसाद वाटण्यात आला. घराघरात दीप प्रज्वलन करण्यात आल्यामुळे चामोर्शीतील वातावरण हर्षोल्हासाने आणि भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाले. जणूकाही दिवाळीच आली, असा उत्साह नगरात दिसत होता.
- दिलीप चलाख, चामोर्शी