माजी नगरसेवक पिता-पुत्र जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 07:51 PM2023-05-25T19:51:55+5:302023-05-25T19:52:24+5:30

Yawatmal News यवतमाळ शहरातील माजी नगरसेवक पिता-पुत्राविरोधात पोलिसांनी कठोर पाऊल उचलले. या टोळीतील प्रमुख तिघांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

Ex-corporator father-son suspended from district for three months | माजी नगरसेवक पिता-पुत्र जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी तडीपार

माजी नगरसेवक पिता-पुत्र जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी तडीपार

googlenewsNext

यवतमाळ : शहरातील ठराविक भागात संघटितरीत्या अवैध धंदे चालविणे, नागरिकांमध्ये भय निर्माण होईल असे शरीर विषयक गुन्हे करणे, सार्वजनिक सुव्यवस्था व शांतता भंग करणे असे कृत्य सातत्याने करणाऱ्या यवतमाळ शहरातील माजी नगरसेवक पिता-पुत्राविरोधात पोलिसांनी कठोर पाऊल उचलले. या टोळीतील प्रमुख तिघांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.


माजी नगरसेवक सलीम शहा उर्फ सलीम सागवान सुलेमान शहा (५८), शहेजाद शहा सलीम शहा (३२), शकील शहा सलीम शहा (२८) तिघे रा. अलकबीर नगर यवतमाळ असे कारवाई करण्यात आलेल्या पिता-पुत्रांची नावे आहे. यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे आहेत. सागवान कुटुंब व त्यांच्या पाठीराख्या टोळीने दहशत निर्माण केली. अशा स्वरूपाचे गुन्हे सातत्याने दाखल झाले. त्यामुळे या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी पाऊल उचलले. महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ कलम ५५ (१) नुसार तडीपारी करण्याचा प्रस्ताव शहर पोलिसांनी सादर केला. पोलिस अधीक्षक यांच्या मंजुरीनंतर गुरुवारी या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात आली. तीनही पिता-पुत्रांना यवतमाळ जिल्हा सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.

त्यांनी पुढील तीन महिने जिल्ह्यात पाय ठेवू नये, अटी-शर्तीचा भंग केल्यास त्यांच्याविरुद्ध पुन्हा कारवाई प्रस्तावित केली जाईल, नंतर एमपीडीएचा प्रस्ताव दाखल करून कारागृहात डांबण्यात येईल. अशा स्वरूपाच्या कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये जबर निर्माण झाली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप परदेशी, पोलिस निरीक्षक नंदकुमार पंत, सहायक निरीक्षक जनार्दन खंडेराव, उपनिरीक्षक धनराज हाके, राजेश तिवारी, बालाजी ठाकरे, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, राम पोपळघट यांनी ही कारवाई केली.
 

गुन्हेगारी टोळ्या पोलिसांच्या रडारवर
आपल्या कृत्यातून जनसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. प्रत्येक गुन्हेगाराची व त्या टोळीतून होणाऱ्या बेकायदेशीर कृत्याची नोंद पोलिसांकडून घेतली जात आहे. याच पद्धतीने या टोळ्यांना जिल्ह्याबाहेर काढणे अथवा कारागृहात डांबणे या दृष्टीने पोलिस काम करीत आहे. भयमुक्त वातावरणासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे पोेलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Ex-corporator father-son suspended from district for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.