आजी-माजी आमदारांचीही लागणार कसोटी
By admin | Published: February 8, 2017 12:28 AM2017-02-08T00:28:28+5:302017-02-08T00:28:28+5:30
येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक : चार गटातून १७ तर आठ गणातून ३८ उमेदवार रिंगणात
नरेश मानकर पांढरकवडा
येत्या १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून जिल्हा परिषदेच्या ४ गटातून १७ उमेदवार तर पंचायत समितीच्या आठ गणातून ३८ उमेदवार निवडणूकरिंगणात आहे.
मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर तसेच तालुक्यातील पंचायत समितीवर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी भाजपचे विद्यमान आमदार राजू तोडसाम व काँग्रेसचे शिवाजीराव मोघे व प्रा.वसंतराव पुरके या काँग्रेसच्या दोन माजी आमदारांची कसोटी लागणार आहे. आजपर्यंत तालुक्यातून जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. हिच परिस्थिती पंचायत समितीच्या निवडणुकीची असून आजपर्यंत पंचायत समितीवर सुध्दा भाजपचे फुल उगवले नाही. अद्याप पर्यंत भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपले खाते न उघडल्यामुळे या निवडणुकीत तरी आपले उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी भाजप आमदाराचा चांगलाच कस लागणार आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे व या भागातील आमदारसुध्दा भाजपचा असल्यामुळे ही निवडणूक भाजप आमदारासाठी महत्वाची आहे. मागील निवडणुकीत असलेल्या मोहदा, पहापळ , पाटणबोरी या तीन जिल्हा परिषद गटात आता खैरगाव (बु.) या एका नविन गटाची भर पडली आहे. या चारही गटातून एकुण २४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून चार गटातून १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
पाटणबोरी या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण असलेल्या गटातून सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून आता या गटातू ४ उमेदवार निवडणूक लढवित आहे. सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या पहापळ गटातून पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एका उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतली असून या गटातून आता ४ उमेदवार निंवडणूक लढवित आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मोहदा या गटातून आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून या गटामधून आता सहा उमेदवार निवडणूक लढवित आहे.
पाटणबोरीतून सहा पैैकी एकाची माघार
नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या खैरगाव बु.या गटातून पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.२ उमेदवारांनी माघार घेतली असून आता तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.पंचायत समितीच्या पाटणबोरी या सर्वसाधारण गणातून सहापैकी एका उमेदवारांने माघार घेतली असून या गणातून ५ उमेदवार निवडणूकलढवित आहे.