परीक्षा हाॅल रिकामा अन् मैदानात घोषणाबाजी; आश्रमशाळा शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन

By अविनाश साबापुरे | Published: September 17, 2023 10:13 PM2023-09-17T22:13:25+5:302023-09-17T22:14:21+5:30

आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

Exam hall empty and sloganeering in the ground; Boycott movement of ashram school teachers | परीक्षा हाॅल रिकामा अन् मैदानात घोषणाबाजी; आश्रमशाळा शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन

परीक्षा हाॅल रिकामा अन् मैदानात घोषणाबाजी; आश्रमशाळा शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन

googlenewsNext


यवतमाळ : आश्रमशाळाशिक्षकांसाठी आदिवासी विकास विभागाने रविवारी क्षमता चाचणीचे आयोजन केले होते. मात्र या परीक्षेवर बहिष्कार टाकत शिक्षकांनी येथील पोस्टल मैदानात एकवटून आदिवासी विकासमंत्र्यांविरुद्ध जोरदार नारेबाजी केली. तर दुसरीकडे परीक्षेचा हाॅल मात्र रिकामा होता. 

आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शिक्षकांची क्षमता वाढविण्याच्या नावाखाली दर तीन महिन्यांनी शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला आहे. त्यासोबतच आश्रमशाळांचे वेळापत्रकही बदलले आहे. हे दोन्ही निर्णय अन्यायकारक असून ते रद्द करावे, अशी कर्मचारी संघटनेने गेल्या अनेक दिवसांपासून मागणी रेटून धरली आहे. शिक्षक दिनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. मात्र दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने क्षमता चाचणीवरच बहिष्कार घोषित केला. रविवारी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र आश्रमशाळांचे शिक्षक परीक्षेला न जाता येथील पोस्टल मैदानात एकत्र आले. 

येथे आदिवासी विकास मंत्र्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली गेली. संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राऊत, विदर्भ प्रमुख साहेबराव मोहोड, राजेश उगे, महेश मोकडे यांच्यासह शेकडो शिक्षक यांच्या आंदोलनात सहभागी होते. विशेष म्हणजे यात शिक्षिकांची उपस्थिती लक्षणीय होती. आश्रमशाळेचे वेळापत्रक बदलल्यामुळे सर्व कर्मचारी आणि आदिवासी विद्यार्थी त्रस्त आहेत. आश्रमशाळेतील अर्धवट इमारती, अपूर्ण निवास व्यवस्था, अपुरे व नादुरुस्त शासकीय निवासस्थाने, अपुरी शौचालये व स्नानगृहे, संसाधनांची कमतरता याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या उणिवांचा अनिष्ट परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आणि अभ्यासावर होत आहे. मात्र या बाबीकडे लक्ष देता आदिवासी विकास मंत्री वेळापत्रकासारख्या मुद्द्यांवरून शिक्षकांचा छळ करीत असल्याचा आरोप संघटनेने केला.

दबावाचा आरोप
दरम्यान शिक्षकांनी क्षमता चाचणीला हजर राहावे, यासाठी प्रशासनाने संस्थाचालकांच्या माध्यमातून दबाव आणल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला. कंत्राटी शिक्षकांना या चाचणीसाठी जबरदस्तीने हजर राहण्यास भाग पाडल्याचा आरोपही यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राऊत यांनी केला.
 

 

Web Title: Exam hall empty and sloganeering in the ground; Boycott movement of ashram school teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.