लॉकडाऊनच्या काळातही परीक्षा होणार सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:41 AM2021-04-07T04:41:49+5:302021-04-07T04:41:49+5:30
जिल्हा प्रशासनाचा निर्वाळा : विद्यार्थ्यांसह परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनाही मुभा फोटो यवतमाळ : कोरोना सर्वांचीच परीक्षा पाहत आहे. त्यातल्या त्यात ...
जिल्हा प्रशासनाचा निर्वाळा : विद्यार्थ्यांसह परीक्षा केंद्रावरील शिक्षकांनाही मुभा
फोटो
यवतमाळ : कोरोना सर्वांचीच परीक्षा पाहत आहे. त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांची तर अधिकच. एकीकडे प्रशासनाने जिल्हाभर लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनच्याच काळात दहावी-बारावीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे निर्बंध असताना परीक्षा केंद्रापर्यंत कसे पोहोचावे याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळातही सर्वच परीक्षा सुरळीतपणे पार पडतील, असा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना दिला.
राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने ५ ते ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. याच दरम्यान २३ आणि २९ एप्रिलपासून जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. लॉकडाऊन काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर निर्बंध आहे. तर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय शनिवारी आणि रविवारी तर दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळेस संचारबंदी आहे. अशा वेळी परीक्षेसाठी कसे पोहोचता येईल, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे याच काळात राज्य सेवा पूर्वपरीक्षाही होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरगावातून विद्यार्थी यवतमाळात येण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी त्यांना पास घ्यावा लागेल काय, प्रशासनाची विशेष परवानगी त्यासाठी आवश्यक असेल का आदी मुद्द्यांवरून संभ्रम निर्माण झाला आहे.
या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे म्हणाले की, दहावी-बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडतील. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लॉकडाऊनचा कुठलाही अडथळा येणार नाही. शिवाय बाहेरगावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हॉटेलची पार्सल सेवाही सुरूच आहे. वाहतूक सेवाही सुरूच आहे. तसेच अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरगावातून येऊनही परीक्षा देता येणार आहे.
बॉक्स
शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत
विशेष म्हणजे मंगळवारी शहरातील ११ केंद्रांवर एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीतपणे पार पडली. या परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थी व परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना सूट दिली होती. जिल्ह्यातील २६०२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. याचप्रमाणे काही दिवसांवर आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षाही सुरळीत पार पडतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.