नाममात्र रॉयल्टीवर हजारो ब्रास मुरूमाचे उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:00 AM2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:00:29+5:30
थाळेगाव (पुनर्वसन) येथील खदानीतून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. नाममात्र रॉयल्टी व वाहतूक परवाना मिळवून हजारो ब्रास मुरुम खोदुन नेला जात आहे. काही दिवसांपूर्वी तर, ५० ब्रास मुरुमाची रॉयल्टी काढून हजारहून ब्रास मुरुम खोदून नेण्यात आला. विशेष म्हणजे दोन किंवा तीन गाड्यांना वाहतूक परवाना असताना आठ ते दहा गाड्या मुरुम वाहतुकीसाठी वापरल्या जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : नाममात्र रॉयल्टी भरून हजारो ब्रास गौण खनिजाच्या उत्खननाचा गोरखधंदा कळंब शहरात अनेकांनी सुुरू केला आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने थाळेगाव (पुनर्वसन) येथील खदान सफाचट करण्याचे काम गौण खनीज माफियाकडून केले जात आहे. या प्रकरणी सरपंचाने केलेली तक्रारही दुर्लक्षित आहे.
थाळेगाव (पुनर्वसन) येथील खदानीतून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. नाममात्र रॉयल्टी व वाहतूक परवाना मिळवून हजारो ब्रास मुरुम खोदुन नेला जात आहे. काही दिवसांपूर्वी तर, ५० ब्रास मुरुमाची रॉयल्टी काढून हजारहून ब्रास मुरुम खोदून नेण्यात आला. विशेष म्हणजे दोन किंवा तीन गाड्यांना वाहतूक परवाना असताना आठ ते दहा गाड्या मुरुम वाहतुकीसाठी वापरल्या जातात. यातून हजारो ब्रास मुरुमाची चोरी केली जाते. मुरुमाची रॉयल्टी भरुन वाहतूक पास काढली जाते. ठराविक वेळ व दिवसासाठी ही पास असते. परंतु विविध कारणे देऊन याचा कालावधी वाढवून घेतला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केली जाते. नाममात्र रॉयल्टीवर मोठ्या प्रमाणात मुरुम खोदून नेण्यात आल्याची तक्रार थाळेगावचे सरपंच दिनेश वानखडे यांनी तहसील कार्यालयात केली. परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अखेर त्यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून चौकशीची मागणी केली.
कंटूर मॉपने मोजणी झाल्यास होणार चोरी उघड
थाळेगाव खदानीतून लाखो ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्यात आले, हे कोणापासूनही लपून नाही. हे सिध्द करायचे असले तर खदानची कंटूर मॉपने मोजणी करणे गरजेचे आहे. त्यानंतरच किती रॉयल्टी भरण्यात आली व किती मुरुमाची चोरी झाली हे स्पष्ट होईल.
गौण खनिजाच्या चोरीची तक्रार प्राप्त झाली आहे. महसूल विभाग यावर लक्ष ठेवून आहे. यापुढे चोरी होणार नाही यादृष्टीने उपाययोजना होईल.
- राजेश कहारे,
प्रभारी तहसीलदार, कळंब