पुसदमध्ये कंत्राटदाराचे वनजमिनीवर खोदकाम

By admin | Published: January 1, 2017 02:24 AM2017-01-01T02:24:02+5:302017-01-01T02:24:02+5:30

पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने मुरुमासाठी चक्क वनजमीन खोदल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघडकीस आला आहे

Excavator at contractor Vanzimini in Pusad | पुसदमध्ये कंत्राटदाराचे वनजमिनीवर खोदकाम

पुसदमध्ये कंत्राटदाराचे वनजमिनीवर खोदकाम

Next

जेसीबी, टिप्पर जप्त : वन गुन्हा दाखल, डीएफओंचे आदेश
पुसद : पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने मुरुमासाठी चक्क वनजमीन खोदल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघडकीस आला आहे. थेट आयएफएस असलेल्या उपवनसंरक्षकांच्या आदेशावरून या कंत्राटदाराचे जेसीबी आणि टिप्पर घटनास्थळावरून जप्त करण्यात आले.
पी.के. जाधव (वडते) असे या कंत्राटदाराचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध वन विभागाने ३० डिसेंबर रोजी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ डीएचजी अन्वये गुन्हा (क्र.४२/४) नोंदविला आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुसद-माहूर रस्त्याच्या बांधकामाचा कंत्राट पी.के. जाधव यांना मिळाला आहे. या मार्गावर पुसदपासून काही अंतरावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी वळण रस्ता निर्माण करण्यात आला. मात्र वनजमिनीतून गेलेल्या या वळण रस्त्यासाठी काळी दौ. वनपरिक्षेत्रातील हुडी येथे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. या गंभीर प्रकाराबाबत अज्ञात व्यक्तीने पुसद येथील उपवनसंरक्षक अरविंद मुंडे (थेट भारतीय वनसेवा) यांना माहिती दिली. त्याची दखल घेत मुंडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. वाय. वाघवरे, वनपाल जोग, वनरक्षक गब्बरसिंग राठोड यांना घटनास्थळी पाठवून खोदकाम करणारी कुणाचीही यंत्रे असो त्यांचा मुलाहिजा न बाळगता ती जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एस.वाय. वाघवरे यांनी घटनास्थळी भेट दिली असता तेथे जेसीबीने वनजमिनीत खोदकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. तेथील गौण खनिज वाहून नेण्यासाठी घटनास्थळी टिप्परही आढळून आला. वन अधिकाऱ्यांनी हा जेसीबी आणि टिप्पर जप्त केला आहे.
वळण रस्त्यासाठी खोदकाम करताना सदर कंत्राटदाराने वन खात्याची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही, हे विशेष. उल्लेखनीय असे की, पुलाच्या या बांधकाम कंत्राटात एका राजकीय व्यक्तीची भागिदारी असल्याची चर्चाही वनवर्तुळात आहे.

Web Title: Excavator at contractor Vanzimini in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.