सभापती पदांवरून खदखद
By admin | Published: April 3, 2017 12:12 AM2017-04-03T00:12:50+5:302017-04-03T00:12:50+5:30
जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदांवरून सत्ताधाऱ्यांमध्ये प्रचंड खदखद सुरू आहे.
जिल्हा परिषद : काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादीत रस्सीखेच, पुन्हा रूसवे फुगवे
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदांवरून सत्ताधाऱ्यांमध्ये प्रचंड खदखद सुरू आहे. या पदावर आपली वर्णी लागावी म्हणून सर्वच पक्षांतील सदस्य मोर्चेबांधणी करीत आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व अपक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली. सर्वाधिक मोठा पक्ष असलेला शिवसेना सत्तेबाहेर आहे. सत्ता स्थापन करताना चारपैकी प्रत्येकी एक सभापती पद काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व अपक्षाला देण्याचा शब्द देण्यात आला. त्यानुसार प्रत्येकाला एक सभापती पद मिळणार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जाते.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत वेळेपर्यंत बरीच खलबते झाली. तीच स्थिती सभापती पदांबाबत दिसून येत आहे. त्याचवेळी सभापती पदांवरून सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. काँग्रेसमध्ये एका पदासाठी तीन, तर भाजपामध्येही दोन ते तीन सदस्य इच्छुक आहे. राष्ट्रवादीत सभापती पद पुसद परिसराला मिळावे म्हणून चढाओढ सुरू आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला बांधकाम व अर्थ, अपक्षाच्या वाट्याला शिक्षण व आरोग्य, काँग्रेसच्या वाट्याला महिला व बालकल्याण, तर भाजपाच्या वाट्याला समाजकल्याणचे सभापती पद येणार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
सत्ताधाऱ्यांसोबत असणाऱ्या सर्वांनाच ठरल्यानुसार सभापती पदे दिली जातील, असे भाजपाकडून सांगितले जात आहे. काँग्रेसही एक पद मिळणार असल्याचे सांगत आहे. अपक्ष तर निश्ंिचत आहे. मात्र खरी चुरस राष्ट्रवादीत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत प्रथम ३१ सदस्य जुळल्यानंतर सत्ताधाऱ्यांसोबत राष्ट्रवादीचे उर्वरित १० सदस्य आल्याने त्यांचा विचार होणार किंवा नाही, हाच खरा प्रश्न आहे. याच प्रश्नाने भंडावून गेलेल्या राष्ट्रवादीने सभापती पदांचे गणीत जुळते का, याबाबत चाचपणी सुरू केली आहे.
भाजपात अंतर्गत धूसफूस
सत्ता स्थापनेत भाजपाने सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र यवतमाळातील नेत्यांनी पक्षाच्या आमदारांसह जिल्हा परिषद सदस्यांनाही विश्वासात घेतले नसल्याची धूसफूस भाजपात सुरू आहे. अगदी वेळेपर्यंत कुणासोबत युती होणार, याची कल्पना खुद्द आमदारांनाही देण्यात आली नसल्याने भाजपात अंतर्गत खदखद धुमसत आहे. तथापि नेत्यापुढे आमदार आणि सदस्य हतबल ठरले आहे.
राष्ट्रवादीच्या १० सदस्यांमध्ये असंतोष
सत्ताधाऱ्यांसोबत राष्ट्रवादीचे ११ पैकी सर्वाधिक १० सदस्य पुसद परिसरातील आहे. मात्र सभापती पद पुसद बाहेरील सदस्याला मिळण्याचे निश्चित असल्याने पुसद परिसरातील सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यातून ऐनवेळी पुन्हा शिवसेनेसोबत जाऊन सभापती पद बळकविण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनासुद्धा इतर पक्षातील आणखी एक-दोन नाराज सदस्यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्नरत आहे. मात्र त्यांचे प्रयत्न कितपत सार्थकी लागेल, हे सोमवारीच कळणार आहे.
काँग्रेसमध्ये पुन्हा रुसवे-फुगवे
सत्ताधाऱ्यांकडून एक सभापती पद मिळणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जाते. मात्र या पदासाठी पक्षात पुन्हा रूसवे-फुगवे सुरू आहेत. अध्यक्ष पदासाठी डावलल्यामुळे किमान सभापती पद तरी मिळावे म्हणून महिला सदस्यांमध्ये रस्सीखेच आहे. त्यातच माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, माजी आमदारद्वय वामनराव कासावार व विजय खडसे आपल्या मतदारसंघातील सदस्याला सभापतीपद देण्यासाठी अत्यंत आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. (शहर प्रतिनिधी)
अध्यक्ष ठरविणार सभापतींचे विभाग
उपाध्यक्ष आणि दोन सभापतींना कोणते विभाग द्यायचे, याचा निर्णय अध्यक्षांना घ्यावयाचा आहे. समाजकल्याण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाचे सभापती ३ एप्रिलला निश्चित होतील. मात्र बांधकाम, शिक्षण, अर्थ, आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन हे विभाग कुणाकडे सोपवायचे, याचा निर्णय अध्यक्ष घेतील. यात कृषी व पशुसंवर्धन या दोन विभागांची सांगड असून त्यांना वेगळे करता येत नाही. उर्वरित चारपैकी कोणतेही दोन विभाग एकत्र करण्याचा निर्णय अध्यक्षांवर अवलंबून असणार आहे.