एसीबीच्या ट्रॅपमुळे ‘एक्साईज’चे कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 05:00 AM2021-08-29T05:00:00+5:302021-08-29T05:00:17+5:30
तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज दारूचा चोरटा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील मोहदा, रुंझा, करंजी, पहापळ, पाटणबोरी या गावांसह अनेक गावांमध्ये अवैधरीत्या दारू गाळण्याचा, तसेच देशी, विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्थानिकांना विशेष करून महिलांना मोठा त्रास होत आहे. कित्येक कुटुंबामध्ये कलहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे, तसेच सामाजिक आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : अलिकडेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जमादाराला दाेन हजार रुपयांची लाच घेताना सहायक दुय्यम निरीक्षकाला रंगेहात पकडून अटक केली. या घटनेने आता येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणात
याच कार्यालयातील आणखी काही अधिकारी अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एकीकडे लाच प्रकरणानंतर पांढरकवडा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय चर्चेत आले असताना दुसरीकडे तालुक्यात बिकट चित्र पहायला मिळत आहे. पांढरकवडा तालुक्यातील अनेक गावात ठराव घेऊन दारूबंदी करण्यात आली आहे. गावातील महिला व सजग नागरिकांमुळे काही गावात दारूवर काही अंशी नियंत्रण असले, तरी अनेक गावे याला अपवाद ठरत आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू गाळण्याचा, तसेच देशी दारू विकण्याचा व्यवसाय सुरू आहे, तसेच ढाब्यावर, हॉटेलमध्ये दररोज दारू विक्री होत आहे.
याबाबत नागरिकांनी अनेकदा उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केल्या, परंतु उत्पादन शुल्क विभागाने संबंधितांवर आजपर्यंत ठोस कारवाई केली नाही. केवळ कारवाईचा फार्सच पार पाडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागच सध्या कारवाईच्या फेऱ्यात अडकल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज दारूचा चोरटा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील मोहदा, रुंझा, करंजी, पहापळ, पाटणबोरी या गावांसह अनेक गावांमध्ये अवैधरीत्या दारू गाळण्याचा, तसेच देशी, विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्थानिकांना विशेष करून महिलांना मोठा त्रास होत आहे. कित्येक कुटुंबामध्ये कलहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे, तसेच सामाजिक आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे काही गावात दारूबंदी आहे, तर दुसरीकडे जवळील महामार्गावर, राज्य मार्गावर अनेक ढाब्यावर, हॉटेलमध्ये हजारो रुपयांची विनापरवाना दारूमुळे किमतीच्या दुप्पट विक्री केली जात आहे. यामुळे गावठीसह देशी दारूचा व्यवसायही जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यात ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे.
अवैध दारू विक्रेते बनत आहेत मालामाल
- अवैध दारू व्यावसायिक यात मालामाल होतानाही दिसत आहे. तालुक्यात चोरट्या मार्गाने दारूमाफिया दारूसाठा उपलब्ध करीत आहेत. काही गावांमधून गावठी दारू व पांढरकवडा येथून देशी दारू दुचाकी व चारचाकी वाहनाद्वारे इतर ठिकाणच्या अवैध व्यावसायिकाकडे पोहोचविल्या जात आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत आहे.