जिल्ह्यात एक्साईजचे धाडसत्र, अडीच लाखांची हातभट्टी दारू जप्त
By सुरेंद्र राऊत | Updated: March 24, 2024 21:16 IST2024-03-24T21:16:35+5:302024-03-24T21:16:59+5:30
एक्साईजच्या पथकाने पुसद, यवतमाळ, पांढरकवडा या उपविभागात होळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेतली.

जिल्ह्यात एक्साईजचे धाडसत्र, अडीच लाखांची हातभट्टी दारू जप्त
यवतमाळ : धुळवडीसाठी गावागावात हातभट्टीच्या दारूचे गाळप केले जाते. दारू तस्करांकडून जंगलातील नाले, शेतातील पानवठे अशा ठिकाणी हातभट्टीची दारू काढली जाते. यावर धाडसत्र राबवत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मागील तीन दिवसात २३ ठिकाणी कारवाई करत २४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत तब्बल दोन लाख ५६ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.
एक्साईजच्या पथकाने पुसद, यवतमाळ, पांढरकवडा या उपविभागात होळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेतली. थेट पेटत्या भट्ट्यांवर एक्साईजचे पथक पोहोचले. दारूचे गाळप करताना काहींना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत ७९ लिटर देशी दारू तर २७० लिटर विदेशी दारू हाती लागली. यासोबतच मोहफुलाचा सडवा, २० लिटर ताडी व एका घटनास्थळावर दुचाकी मोटारसायकल कारवाई पथकाच्या हातात लागली. या कारवाईमुळे हातभट्टी गाळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. धुळवडीच्या दिवशीही अवैध विक्रीवर वाॅच राहणार आहे.