एक्साईजच्या ‘वसुली’चे दरपत्रक

By admin | Published: September 16, 2015 03:03 AM2015-09-16T03:03:26+5:302015-09-16T03:03:26+5:30

अवैध दारू विक्रीला प्रतिबंध करणे आणि अधिकृत दारूची अधिकाधिक विक्री वाढवून शासनाच्या तिजोरीत भर घालण्याची ...

Excise's Recovery Booklet | एक्साईजच्या ‘वसुली’चे दरपत्रक

एक्साईजच्या ‘वसुली’चे दरपत्रक

Next

हा घ्या हिशेब : बीअरबार, देशी-विदेशी विक्रेते ‘टार्गेट’, पाच रूपयात परमीट थंडबस्त्यात
यवतमाळ : अवैध दारू विक्रीला प्रतिबंध करणे आणि अधिकृत दारूची अधिकाधिक विक्री वाढवून शासनाच्या तिजोरीत भर घालण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाची आहे. मात्र हा विभाग अवैध दारूबंदी करण्याऐवजी वैधरीत्या दारू विकणाऱ्यांना ‘टार्गेट’ करून त्यांच्याकडून दरमहा ‘वसुली’ करतो. या वसुलीचे ‘दरपत्रक’च उघड झाले आहे.
देशी-विदेशी दारू विक्रेते, बीअरबार मालक, बीअर शॉपी मालक दरवर्षी शासनाकडे ठराविक रक्कम भरून आपल्या परवान्याचे नूतणीकरण करून घेते. त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमात असेल तर संरक्षण देणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश वेळी त्यांना नियमबाह्य दाखवून ‘वसुली’ केली जाते. या वसुलीचा आता पायंडाच पडला असून त्याआड नियमबाह्य कामांसाठी या दारू विक्रेत्यांना जणू मूभा दिली जाते. या वसुलीचे एक प्रकारे दरपत्रकच दारू विक्रेत्यांच्या खास डायरीत नमूद आहे. साहेबांच्या नावावर प्रत्येक बीअर शॉपी, वाईन बार, देशी दारू विक्रेता, वाईन शॉप यांच्याकडून ५०० रुपये वसूल केले जाते. शहराच्या साहेबांनाच नव्हे तर त्यांच्या शिपायालाही रक्कम द्यावी लागते. भरारी पथकाचे साहेब आणि त्यांच्या शिपायालासुद्धा सांभाळावे लागते. विशेष असे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असूनही सर्रास ‘पाकिटे’ स्वीकारली जातात. प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी जिल्हाभरातील सर्व बार मालक, देशी-विदेशी विक्रेते, बीअर शॉपी मालक आपली वसुली एक्साईज कार्यालयात पोहोचवित असल्याचे सांगितले जाते. या सर्व वसुलीत दोन एक्साईज कॉन्स्टेबलची भूमिका सर्वाधिक महत्वाची राहत असल्याचे समजते. अनेकदा नागपूर व मुंबईतूनही पथके ‘धाडी’च्या निमित्ताने येतात. मात्र त्यांचा हिशेब दोन होलसेलर सांभाळत असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात होलसेलरकडून होणाऱ्या वसुलीचा तर हिशेबच नाही. शहरात सात ते आठ ठोक विक्रेते आहे.
हप्ता देण्यास आडेवेढे घेणाऱ्या विक्रेत्यांना एमआरपी, स्टॉक, लायसन्स नंबर याआड कारवाईला सामोरे जावे लागते. मध्यंतरी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून दारू पिणाऱ्यासाठी पाच रुपये परमीट ही योजना सुरू केली गेली होती. मात्र त्यांचे दुर्लक्ष होताच ही योजना थंडबस्त्यात पडली आहे. दारू दुकानांसाठी वेळा ठरवून दिल्या गेल्या आहेत. बीअरबारला सकाळी ११.३० ते रात्री ११.३०, बीअर शॉपी सकाळी १० ते रात्री ११.३०, देशी विक्रेता सकाळी १० ते रात्री १० अशा वेळा निश्चित आहेत. मात्र प्रत्यक्षात या वेळांचे कुणीही पालन करीत नाही. देशी दारू दुकाने तर अगदी पहाटे उघडलेली पहायला मिळतात. हीच अवस्था बीअर शॉपीची आहे. इकडे बीअरबार रात्री उशिरापर्यंत सुरूच असतात. कित्येकदा तर खुद्द एक्साईज व पोलीसची यंत्रणाही रात्री १२ नंतर तेथे दारू पिताना पहायला मिळते. बीअर शॉपीमधून केवळ बीअर विक्रीची परवानगी असताना प्रत्यक्षात एका शॉपीतून सर्वच प्रकारच्या दारू आणि त्यातही देशी मोठ्या प्रमाणात विकत असल्याची माहिती आहे. ‘ड्राय-डे’च्या दिवशी तर या शॉपीतून खुलेआम विक्री होते. मात्र आजपर्यंत या शॉपीवर एक्साईजने अथवा पोलीसने कारवाई केलेली नाही. एक्साईजमध्ये वर्षानुवर्षांपासून तीच ती यंत्रणा कार्यरत आहे. केवळ तेथल्या तेथे ते शहर-ग्रामीण असे चेंज करतात. एक्साईजची पुसद, वणी येथेही पथके आहेत. त्यांचा हिशेब तर यापेक्षाही वेगळा आहे. एकूणच एक्साईजमध्ये महिन्याकाठी किती तरी लाखो रुपयांची उलाढाल होते. त्याचे लाभार्थीही दूरपर्यंत आहेत. राजकीय क्षेत्रातही त्याचे वाटेकरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Excise's Recovery Booklet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.