वन विभागाच्या नोटीसमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:44+5:302021-09-21T04:47:44+5:30
महागाव : तालुक्यातील घोंसरा बीटमधील माळवागद येथील पारधी बेडा आपल्या मालकीच्या जागेवर वसल्याचा साक्षात्कार ५० वर्षांनंतर वन विभागाला झाला. ...
महागाव : तालुक्यातील घोंसरा बीटमधील माळवागद येथील पारधी बेडा आपल्या मालकीच्या जागेवर वसल्याचा साक्षात्कार ५० वर्षांनंतर वन विभागाला झाला. परिणामी आता वन विभागाने ग्रामस्थांना अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिली आहे.
ज्या गावकऱ्यांनी अतिक्रमण केले, अशांनी मालकी पुरावे काळी दौलत खान येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सादर करावे, अन्यथा अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. या नोटीसमुळे खळबळ उडाली आहे. घोंसरा वर्तुळ कक्ष क्रमांक ७९४ मध्ये लांबी १६ मीटर रुंदी ९.७ मीटर राखीव वनक्षेत्रावर अतिक्रमण केल्याने ९० नागरिकांना मालकी हक्काबाबत कागदपत्रे सादर करण्याकरिता आठ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.
साडेतीन हजार लोकसंख्या असलेले माळवागद गाव आहे. आदिवासीबहुल बंजारा आणि खास करून पारधी बेडा म्हणून ओळख असलेला हे गाव सध्या वन विभागाच्या अजेंड्यावर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. हे गाव पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहे. वन विभागाने ज्यांना नोटीस बजावलेल्या आहे, अशा जागेत ग्रामपंचायत इमारत, दुकान गाळे, समाज मंदिर, इतर शासकीय कार्यालय आणि खासदार व आमदारांनी दिलेल्या निधीतून सार्वजनिक विकासाची कामे उभी राहिली आहे.
कोट
५० वर्षांपासून या ठिकाणी वसलेले गाव आजपर्यंत वन विभागाला दिसले नाही. ज्यांना अतिक्रमणसंदर्भात नोटीस बजावण्यात आली, ते क्षेत्र मोठे आहे. तेथे शासनाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहे. सर्व नागरिकांना गाव नमुना आठ देण्यात आला आहे. आमदार अॅड. नीलय नाईक यांच्यामार्फत हे प्रकरण शासनस्तरावर लावून धरण्यात येईल.
मोहन चव्हाण, माजी सरपंच, माळवागद