तीन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणामुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 05:00 AM2021-12-23T05:00:00+5:302021-12-23T05:00:07+5:30
मानवी अविनाश चोले असे अपहृत चिमुकलीचे नाव आहे. सोमवारी दुपारी २.३०च्या सुमारास ती घरासमोर शेजारील चिमुकल्यांशी खेळत होती. तिचे वडील अविनाश हे शेतात गेले होते तर आई पूजा घरी होती. दुपारी वडील घरी परतल्यानंतर मानवी कुठेच दिसली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. पूर्ण गावातही मानवी मिळाली नाही. त्यानंतर कुटुंबियांनी आजूबाजूच्या शिवारातील विहिरींतही पाहणी केली. मात्र, मानवी कुठेच सापडली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्यातील कुऱ्हा-डुमणी येथून तीन वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मानवी अविनाश चोले असे अपहृत चिमुकलीचे नाव आहे. सोमवारी दुपारी २.३०च्या सुमारास ती घरासमोर शेजारील चिमुकल्यांशी खेळत होती. तिचे वडील अविनाश हे शेतात गेले होते तर आई पूजा घरी होती. दुपारी वडील घरी परतल्यानंतर मानवी कुठेच दिसली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. पूर्ण गावातही मानवी मिळाली नाही. त्यानंतर कुटुंबियांनी आजूबाजूच्या शिवारातील विहिरींतही पाहणी केली. मात्र, मानवी कुठेच सापडली नाही. अखेर अविनाश चोले यांनी पोलीस ठाण्यात मानवीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर मंगळवारी पोलिसांनी यवतमाळ येथून श्वानपथकाला पाचारण केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आर्णी पोलिसांनी परिसरातील जंगल पिंजून काढले. शेतशिवारामधील विहिरींमध्येही शोध घेतला. कुऱ्हा-डुमणी, भानसरा परिसरातील संशयास्पद जागीसुद्धा पाहणी केली. मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत मानवीचा कुठेही शोध लागला नाही. श्वानपथकही कुऱ्हा येथे काही अंतरावर घुटमळले. त्यामुळे आता मानवीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
आर्णी पोलीस व एलसीबीचे पथक अपहरणासह गुप्तधनाच्या दिशेनेही तपास करत आहेत. ठाणेदार पितांबर जाधव, एलसीबी प्रमुख प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्वात मानवीचा शोध सुरू आहे.
मंदिर, नाल्यांचीही पाहणी
मानवीच्या शोधात पोलिसांनी जंगलासह लगतची मंदिरे आणि नदी-नाल्यांचीही पाहणी केली. दोन ते तीन विहिरींचा गाळ उपसूनही शोध घेतला. जंगलातील संशयास्पद ठिकाणांची बारकाईने पाहणी केली. मात्र, अद्याप मानवी आढळली नाही. त्यामुळे पोलिसांनी आता अपहरणासह मानवीला गुप्तधनाच्या लालसेने तर पळवून नेले नाही ना, या दिशेनेही तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर कुऱ्हा-डुमणी येथील ग्रामस्थ मात्र भयभीत झाले आहेत.