टिपेश्वर अभयारण्यात क्षमतेच्या चौपट वाघांचे अस्तित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:00 AM2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:06+5:30
वन विभागाच्या रेकॉर्डवर १८ ते १९ वाघांची नोंद असून प्रत्यक्षात २८ ते ३० वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघांची ही संख्या अभयारण्याच्या कार्यक्षेत्राच्या चौपट अधिक असल्याचे दिसून येते. वास्तविक क्षेत्र कमी आणि वाघ जास्त झाल्याने त्यांना पकडून इतरत्र हलविणे, त्यांना त्यांच्या क्षेत्रात मोकळीक देणे आणि मानवी वस्त्यांमधील त्यांचा संचार, शेतशिवारातील हल्ले थांबविणे अपेक्षित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील पर्यटनाचे प्रमुख वैभव असलेल्या पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यात ‘क्षेत्र कमी आणि वाघांची संख्या जास्त’ अशी विसंगत स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाघ जंगलाबाहेर येत असून ते मानवी व पशु जीवांसाठी धोकादायक बनले आहेत.
वन्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एका नर वाघाला किमान ८० चौरस किलोमीटर तर मादी वाघाला २० चौरस किलोमीटर क्षेत्र लागते. त्याच्या या संचार क्षेत्रात तो अन्य कुणाला एन्ट्री करू देत नाही. त्यामुळे इतर वाघ आपले क्षेत्र इतरत्र शोधतात. त्यामुळे क्षेत्र निश्चित करण्याच्या नादात हे वाघ अभयारण्याबाहेर येऊ लागले आहे. मात्र मानवाला वाघांनी आपल्या हद्दीत अतिक्रमण केल्याचा समज होऊ लागला आहे. प्रत्यक्षात वाघाला त्याचे क्षेत्र कमी पडत आहे.
टिपेश्वर अभयारण्याचे एकूण क्षेत्र १४८ चौरस किलोमीटर एवढे आहे. तेथे जास्तीत जास्त ७ ते ८ वाघ संचार करू शकतात. मात्र तेथे वन विभागाच्या रेकॉर्डवर १८ ते १९ वाघांची नोंद असून प्रत्यक्षात २८ ते ३० वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघांची ही संख्या अभयारण्याच्या कार्यक्षेत्राच्या चौपट अधिक असल्याचे दिसून येते. वास्तविक क्षेत्र कमी आणि वाघ जास्त झाल्याने त्यांना पकडून इतरत्र हलविणे, त्यांना त्यांच्या क्षेत्रात मोकळीक देणे आणि मानवी वस्त्यांमधील त्यांचा संचार, शेतशिवारातील हल्ले थांबविणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात सरकार व वन प्रशासन याकडे लक्षच देत नसल्याचे दिसून येते. वाघांच्या दहशतीमुळे टिपेश्वर बाहेरील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतींच्या कामांवरही त्याचा परिणाम होतो आहे.
प्रत्येक व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यांची स्थिती वेगळी आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६०० चौरस किलोमीटर क्षेत्रात ८० नर वाघांचे वास्तव आहे. त्याचा बफर झोन आता वाढविल्याने सुमारे १२०० चौरस किलोमीटर झाला आहे.
बोर सर्वात छोटे व्याघ्र प्रकल्प
राज्यात बोर हे सर्वात छोटे अर्थात १३० चौरस किलोमीटर क्षेत्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. त्याचा बफर झोन मात्र आता ५०० चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आला आहे. उमरेड-कन्हान व्याघ्र प्रकल्पातसुद्धा कमी क्षेत्रात जास्त मादी वाघ असल्याचे सांगितले जाते.
व्याघ्र प्रकल्प हवा हजार चौकिमींचा
टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचे प्रस्तावित असले तरी त्यासाठी किमान ८०० ते एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्र असणे अपेक्षित आहे. हे क्षेत्र वाढविणे अथवा स्थलांतर करून वाघांची संख्या घटविणे हे पर्याय आहेत.
वाघांच्या स्थलांतरणावर हवा जोर
टिपेश्वरचे कोअर क्षेत्र वाढविताना गावांची अडचण येत आहे. कारण की परिसरात अनेक गावे आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील वाघांची संख्या नियंत्रित करण्यावर, स्थलांतरित करण्यावर जोर दिला जात नसल्याने वाघ अभयारण्याबाहेर गाव आणि शेतशिवारात शिरुन नरभक्षक बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यात आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून आत्ताच व्यापक उपाययोजना न झाल्यास पुढेही मानवी जीवांना वाघांचा धोका कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
क्षमता सात वाघांची, प्रत्यक्षात वावरतात ३० वाघ
तज्ज्ञांच्या मते, टिपेश्वर अभयारण्यात दोन नर आणि पाच मादी वाघ राहू शकतात. परंतु प्रत्यक्षात तेथे वाघांच्या वास्तव्यांची संख्या कितीतरी अधिक आहे. वाघांची सतत भटकंती सुरु असते. एखादा वाघ दरवर्षी ट्रॅप कॅमेरात दिसत असेल तर तो तिथे निवासी झाला असे वन विभाग मानतो. वाघांची पिल्ले मात्र सतत ठिकाण बदलवितात.
टिपेश्वर व पैनगंगा मिळून व्याघ्र प्रकल्प
आता टिपेश्वर आणि पैनगंगा हे दोन अभयारण्या मिळून एक व्याघ्र प्रकल्प करता येतो का या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. टिपेश्वर परिसरात बफर झोन वाढविण्याचाही प्रस्ताव आहे. बफर झोन वाढविल्यास कोणतेही पुनर्वसन करावे लागत नाही. गावे, शेती कायम राहते. मानव व प्राण्यांचे सहअस्तित्व बफर झोनमध्ये मान्य करण्यात आले.